दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटणमधील सुरवडी एमआयडीसीत असलेल्या ‘कमिन्स’ कंपनीच्या कारभाराचा ‘स्थैर्य’ चॅनेलकडून भांडाफोड करण्यात आला आहे. कामगारमंत्री सुरेश खाडे यांना कंपनीच्या अधिकार्यांनी या कंपनीच्या अनेक प्लान्टमध्ये काम करणार्या कंत्राटी कामगारांना २४ हजारांचे वेतन दिले जाते, असे सांगितले होते. हे कंपनीचे म्हणणे धादांत खोटे असल्याचे स्थैर्य चॅनलने केलेल्या रिपोर्टमध्ये आढळून आले आहे.
याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे कमिन्स कंपनीच्या वेतनातील धांदलीविरोधात तक्रार मांडली आहे. त्यानंतर कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी कंपनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत विभागीय आयुक्तांना कंपनीच्या कारभाराची अचानक पडताळणी करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, स्थैर्य चॅनलने कामगारांना विचारल्यानंतर त्यांनी १३ हजार, १७ हजार, ७ हजार असेच वेतन मिळत असल्याचे सांगितले आहे. तसेच कंपनीतील अनेक कंत्राटी कामगारांनी स्थैर्य चॅनेलकडे आपले म्हणणे मांडण्याबाबत नोकरी जाण्याच्या भीतीने नकार दर्शवला.
दरम्यान, कमिन्स कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या फसवणुकीच्या विरोधात चौकशी करण्यात येईल, असेही कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितले आहे.