
स्थैर्य, सातारा, दि.१४: तालुक्यातील ठोसेघर येथे एका दाम्पत्यास मारहाण करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नऊजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पांडूरंग विठोबा जाधव , सुलाबाई पांडूरंग जाधव, संतोष पांडूरंग जाधव (सर्व रा. मायणी, ता. जावळी, सध्या रा. ठोसेघर), रमेश यशवंत बेडेकर, लिलाबाई गणपत पवार, तानाजी कोंडिबा चव्हाण, हरिबा दगडू चव्हाण, रामचंद्र मारुती जाधव, दिलीप भाऊ सुतार (सर्व रा. ठोसेघर) हे नऊजण अशोक जगन्नाथ काकडे (वय 61, रा. ठोसेघर, ता. सातारा) यांच्या ठोसेघर येथील राहत्या घराशेजारी दि. 13 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कम्पाऊंड करत होते. यावेळी अशोक काकडे आणि त्यांच्या पत्नीने या सर्वांना रस्ता सोडून कम्पाऊंड करा, असे सांगितले. याचा राग आल्याने या नऊजणांनी ‘तुझा येथे काही संबंध नाही. आम्ही या जागेचे मालक असून तुला येण्याजाण्याची वाट सरकारला विचार,’ अशी दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी काकडे दाम्पत्याच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्कीही करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर ’जर पुन्हा कामात आडवा आलातर तुला येथेच गाडून टाकू,’ अशी धमकी दिली.या घटनेनंतर काकडे यांनी या नऊजणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर मारामारी केल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल या अधिक तपास करत आहेत.