युतीमध्ये आता समन्वय समिती! शिंदे-फडणवीस लवकरच करणार स्थापना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । मुंबई । लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वृत्तपत्रांमधील शिवसेनेच्या दोन दिवसांमधील जाहिरातीवरून भाजप-शिवसेनेत संबंध ताणले गेले असल्याचे चित्र असताना आता कटूतेचे कोणतेही प्रसंग उद्भवू नयेत म्हणून दोन पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस लवकरच समन्वय समिती स्थापन करतील. वरिष्ठ नेते या समितीत असतील. जेव्हा समिती गठित होईल, तेव्हा प्रत्येक विषय समितीपुढे येतील. तसेच नवी जाहिरात ही शिवसेनेची अधिकृत जाहिरात आहे. महायुतीमध्ये कोणताही बेबनाव होणार नाही, असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. कालचा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आज झाला. पण पुन्हा असे होणार नाही याची काळजी घ्यावी. खा. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील प्रॉक्सी वॉर सरकार कोसळेपर्यंत  सुरू राहील.

भोंडे-गायकवाड भिडले

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत भाजपचे अनिल बोंडे यांनी शिंदे गटावर टीका केली. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे यांच्या ५० वाघांमुळे भाजप मंत्रिमंडळात आहे. भाजप कोणामुळे इतिहासात मोठा झाला; नाहीतर काय औकात होती, असा हल्लाबोल केला.

एकत्र आलेच नाहीत

फडणवीस हे कानाला त्रास होत असल्याने मंगळवारी कोल्हापूरला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्हते.  शिंदे-फडणवीस एसटी महामंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होेते, पण फडणवीस तब्येतीच्या कारणाने अनुपस्थित राहिले.

अजित पवार यांचा दावा

काल आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २६ टक्के, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २३ टक्के असे दिले आहे. दोन्ही टक्के एकत्र केले तर इतर ५१ टक्के लोकांनाही दुसरे मुख्यमंत्री हवे आहेत. वेगवेगळे केले तर ७७ टक्के आणि ७४ टक्के लोकांनी इतरांना पसंती दिली, असा दावा अजित पवार यांनी केला.

भाजपचे मंत्री नाराज!

जाहिरातीत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे फोटो आहेत. पण आपले फोटो नाहीत म्हणून भाजपच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे तक्रार केल्याचे समजते. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचाही फोटो नसल्याने त्यांनी नाराजी बोलून दाखवल्याचे कळते.


Back to top button
Don`t copy text!