फलटण पालिका: काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार; पक्षाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष


स्थैर्य, फलटण, दि. 7 नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रक्रियेत काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी (बेडके) आणि तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

सध्या फलटण शहरात ‘राजे गट’ विरुद्ध ‘खासदार गट’ अशी थेट चुरस पाहायला मिळत आहे. या मुख्य लढतीत काँग्रेस पक्षाने जर वेगळी किंवा स्वतंत्र भूमिका घेतली, तर ती दोन्ही प्रमुख गटांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

अशा परिस्थितीत, दोन्ही प्रमुख गटांना काँग्रेसला सोबत ठेवावे लागेल, अशी राजकीय गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस पक्षाने अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मात्र, नुकत्याच पार पडलेल्या राजे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या पॅनलमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) हे उपस्थित होते.

महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या या उपस्थितीमुळे काँग्रेस पक्ष राजे गटाच्या सोबत जाणार का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!