
स्थैर्य, कराड, दि. 25 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यावर विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ कराड पंचायत समिती कार्यालयासमोर घोषणा देण्यात आल्या. तसेच तहसीलदार अमरदिप वाकडे यांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तरचे युवा नेते व सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील, माणिकराव पाटील, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे यांनी, कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार बटाने, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, सादिक इनामदार, नगरसेवक शिवाजी पवार, मोहम्मद आवटे तसेच कराड उत्तर, कराड दक्षिण व कराड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जशराज पाटील म्हणाले, शरद पवार साहेब यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी काम केले आहे. अशा या थोर व्यक्तीबद्दल नवनिर्वाचित गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कराड उत्तर, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी कराड पंचायत समितीसमोर गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. शासनाने आ. पडळकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत.