
स्थैर्य, कराड, दि. 13 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा-मुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना कराड शहरातील कोविड रुग्णालयात बेडची टंचाई आहे, हे लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची पाहणी आज मलकापूरचे उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवानेते इंद्रजित चव्हाण, प्रांत उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, गजानन आवळकर यांनी केली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आ. पृथ्वीराज चव्हाण हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये पहिल्या दिवसापासून जनतेसाठी कार्यरत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी कायम अग्रभागी असलेले आ. चव्हाण यांनी नुकताच 60 लाख रुपयांचा निधी शहरातील कोरोना रुग्णालयांच्या मदतीसाठी दिला आहे. या निधीतून 2 रुग्णवाहिका व 10 व्हेंटिलेटर दिले जाणार आहेत. लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला मात देण्यासाठी आ. चव्हाण वेळोवेळी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या सोबत चर्चा करत आहेत. यामधूनच शहरातील कोरोना रुग्णालयाचे अधिग्रहण होऊन 1400 हून अधिक बेडचे नियोजन केले आहे. या बेडपैकी 90 टक्के बेड सध्या उपलब्ध झाले आहेत. उरलेले सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेडचे कोरोना उपचार सेंटर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे कोरोना सेंटर या आठवड्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केली.