मुधोजी महाविद्यालयात अमृत कलश संकलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
केंद्र सरकारच्या “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाला प्रतिसाद देत शिवाजी विद्यापीठातील प्रत्येक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटने ‘मेरी माटी मेरा देश’अंतर्गत माती भरलेले कलश जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी भरून त्याची सेल्फी दिलेल्या लिंकवर अपलोड करायची आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनमानसामध्ये राष्ट्रीय भावना विकसित करण्याच्या उद्देशाने तरुण वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. या उपक्रमातील पुढचा टप्पा म्हणून महाविद्यालयांनी हे मातीचे अमृत कलश एकत्रित करून शिवाजी विद्यापीठांमध्ये जमा करायचे आहेत. त्याचे क्लस्टर होस्ट मुधोजी महाविद्यालय असून आज रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडी येथील युनिटचे कार्यक्रमाधिकारी प्रा. कोंडीबा शिंदे, श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवडचे प्रा. दुबाले व नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालय फलटणचे प्रा. दनाने या सर्वांनी आणलेले अमृत कलश स्वीकारण्यासाठी मुधोजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक शिंदे यांनी स्वागताची तयारी करून हे कलश स्वीकारले.

यावेळी बोलताना प्रा. कोंडीबा शिंदे यांनी केंद्र सरकारच्या या उपक्रमाचा महत्त्व व उद्देश सांगितला व जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल जाणीवजागृती विद्यार्थ्यांनी करावी, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी या अमृत कलशाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाच्या भावना तरुणांच्या मध्ये रुजतील व माझी माती माझा देश असे नाते दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक शिंदे यांनी केले तर निवेदन प्रा. कमल कुंभार व आभार प्रदर्शन प्रा. ज्योती काळेल यांनी केले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी प्रा. लवंदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!