

आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ‘ऑन फिल्ड’ उतरून कारवाई केली. महात्मा फुले चौक ते सफाई कॉलनी दरम्यानचा ‘ब्लाइंड स्पॉट’ काढून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा.
स्थैर्य, फलटण, दि. 6 मे : आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव हे स्वतः ‘ऑन फिल्ड’ उतरून कामकाज करत आहेत. त्यांनी शहरातील महात्मा फुले चौक ते सफाई कामगार कॉलनीच्या दरम्यान असणारा एक धोकादायक ‘ब्लाइंड स्पॉट’ (Blind Spot) निर्देशित करून तो हटवला आहे. या कारवाईमुळे या ठिकाणी आता रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असून, वारकरी आणि नागरिकांसाठी हा मार्ग अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे.
■ कारवाईवेळी या अधिकाऱ्यांची उपस्थिती:
पालखी मार्गावरील हा ‘ब्लाइंड स्पॉट’ हटविण्याच्या या प्रत्यक्ष कारवाई दरम्यान मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह नगरपरिषदेच्या नगररचनाकार रत्नरंजन गायकवाड आणि आरोग्य विभाग प्रमुख विनोद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून केलेल्या या पाहणी व कारवाईमुळे प्रशासनाच्या कामाला गती आली आहे.
■ ‘वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही’:
यावेळी नियोजनाबाबत बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले की, “येत्या दोन महिन्यांत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारीचा पालखी सोहळा फलटण शहरातून मार्गस्थ होणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी योग्य ते बदल आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून प्राधान्याने करण्याचा आमचा मानस आहे.”
“नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्या निर्देशानुसार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना फलटण शहरात कसलीही अडचण येऊ देणार नाही, यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे,” अशी ग्वाहीदेखील मुख्याधिकारी जाधव यांनी यावेळी दिली.
