
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२३ | फलटण | श्री संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ (विमानतळ) येथील स्वच्छता आणि साठलेला कचरा उचलण्याची विशेष मोहिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फलटणकर नागरिक, स्वयंसेवी आणि सहकारी संस्था, शिक्षण संस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.

श्री संतश्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येथून पुढे गेल्यानंतर पालखी तळासह (विमानतळ) व परिसराची स्वच्छता मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात येत असून यावर्षीही ती परंपरा अखंडित सुरु ठेवण्यात आली आहे.

या मोहिमेत शहर व तालुक्यातील शिक्षण संस्था मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था मधील आजी/माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी, यांनी सहभागी होऊन योगदान देत पहिल्या टप्प्यात विमानतळ आणि परिसराची स्वच्छता करण्यात येत असून दुसर्या टप्प्यात अन्य भाग घेण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले होते; त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटणमधील अनेक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.





