सातारा शहरातील ७० ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण; वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स सफाई मोहिमेवर


दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२२ । सातारा । सातारा शहरातील 85 पैकी 70 यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. या मोहिमेसाठी वीस सफाई कामगारांचा टास्क फोर्स तैनात असून येत्या 30 मे पर्यंत ही सर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली. ओढ्याचे पाणी तुंबून कुठे घराचे नुकसान होणार नाही या पद्धतीने सफाई मोहिमेमध्ये त्या पद्धतीने काम केले जात आहे.

मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व ओढे-नाले स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. हे काम जवळपास 85 टक्के पूर्ण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या पावसानंतर शहरांमध्ये काही ठिकाणी नाले गटारे तुंबले होते. झेंडा माळनाका राजलक्ष्मी थेटर परिसर येथे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तातडीने तेथे सेवा रस्त्यांना उतार देऊन पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. सातारा शहरातील एकूण 85 पैकी 70 ओढयांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी तीन जेसीबी आणि दहा कामगारांची तुकडी सफाई कामासाठी आळीपाळीने वापरली जात आहे. ओढ्यातील वनस्पती बाजूला करणे, नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे, तसेच त्यातील घाण जेसीबीने बाजूला करणे व उरलेला गाळ आणि इतर राडारोडा सोनगाव कचरा डेपोला स्थलांतरीत करणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत.

मुसळधार पावसामुळे शहराच्या डोंगरी भागातील माचीपेठ, केसरकर पेठ, सदर बाजार, लक्ष्मीटेकडी तसेच बोगदा परिसरातील डोंगराळ भागांमध्ये सफाई मोहिमेला गती देण्यात आली आहे. येथील कचरा तातडीने हटविण्यात येत आहे. मालशे पुलाची अतिक्रमणे तातडीने काढण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र अद्यापही अतिक्रमण न हटवल्याने डोंगर उतारावरून ओढयात येणारे पाणी परिसरातील घरांमध्ये घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.


Back to top button
Don`t copy text!