मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे


स्थैर्य, पुणे, दि. २९ : पुणे येथील मुळा-मुठा नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि शासकीय यंत्रणा काम करीत आहेत. परंतु नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुणे येथील मुळा-मुठा नदीपात्रात प्रदूषण, पर्यावरण तसेच पूर प्रतिबंधाबाबत गुगल मिटद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या वेबिनारमध्ये स्वयंसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी, संबंधित शासकीय यंत्रणा सहभागी झाले होते.

डॉ. गोऱ्हे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी यांच्यासह जलसंपदा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण विषयक कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच संबंधित विभागाकडून प्रदूषण, पुररेषा या विषयी तयार करण्यात आलेला आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. ज्या विभागांचे प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर मंजूर करुन घेण्यासाठी स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे सांगून, पुणे आणि पिंपरी महानगरपालिका क्षेत्रातील शाश्वत विकास करण्यासाठी लक्ष देणार असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले.

मुळा-मुठा नद्यांचा प्रदूषण हा व्यापक विषय असून त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. प्रदुषण विषयी पर्यावरण व हवामानबदल मंत्री आदित्य ठाकरे विषेश लक्ष देत असून वेळोवेळी आढावा घेत आहेत. घनकचऱ्याचे व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, प्लास्टिकचा डांबरीकरणासाठी वापर, नदी पुनरुज्जीवन, नदीत होणारे अतिक्रमणे, राम नदी आणि नद्यांमधील नामशेष झालेले बेटे, सांडपाणी पुर्नवापर आदी विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.


Back to top button
Don`t copy text!