
दैनिक स्थैर्य । 25 जून 2025 । फलटण । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीतील पालखी १९ जून २०२५ रोजी आळंदी येथे प्रस्थान करून २८ जून रोजी फलटण येथे मुक्कामी येण्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेने विविध महत्वाच्या तयारी पूर्ण केल्या आहेत. या संदर्भात नगर मुख्याधिकारी निखील मोरे यांनी कामकाजाची माहिती दिली आहे.
फलटण नगरपालिकेने पालखी मार्गावर आणि शहरात रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे आवश्यक पाठपुरावा केला असून, वेळोवेळी आलेल्या पावसामुळे झालेल्या अडथळ्यांवर तात्पुरती डागडुजी केली आहे. याशिवाय पुलांवरील तुटलेली रेलिंग तात्काळ पुनर्संचित करण्यात आली आहे ज्यामुळे वारकरी सुरक्षितपणे नदीपुलावरून जातील. पालखी मार्गावरील दगड-माती उचलण्याचे आणि स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी स्वतंत्र कार्यसंघ नेमण्यात आला आहे.
वारकर्यांच्या सोयीसाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे तर पाणी टँकर भरण्याचे केंद्र देखील स्थापन केले आहे जिथे आठ टँकर एकाच वेळी भरले जाऊ शकतील. पालखी सोहळ्यासाठी खास वाहतूक नियोजन करून वारकरी मालवाहतूक ट्रक व अन्य वाहनांसाठी वेगळा मार्ग आखण्यात आला आहे.
पालखी तळावर सुद्धा विशेष तयारी झाल्या आहेत. पावसामुळे अडचणी टाळण्यासाठी मुख्य रस्ता डांबरीकरण केला असून साइड पट्ट्यांवर मुरूम भरला गेला आहे. स्वच्छतेसाठी २ जेसीबी, २ ट्रॅक्टर आणि ५० कर्मचारी कामावर आहेत. दर्शन बारीची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून तात्पुरते शौचालय, स्नानगृहे आणि विद्युत रोषणाईसाठी ८ सॅटेलाईट पॉईंट, जनरेटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यावर्षी पालखी तळावर लाल मातीऐवजी कमी जाडीची कच टाकण्याचे नियोजन असून बॅरिकेडिंग करून गर्दीचे नियंत्रण केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने बारकऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी तळाजवळ ‘वारकरी सेवा केंद्र’ उभारण्यात येत आहे जिथे १५० डॉक्टरांची उपस्थिती असेल, तसेच महिला आणि पुरुष वारकऱ्यांसाठी स्नानगृहेही निर्माण केल्या जात आहेत.
पालखी मार्गावर हातगाडे व हॉटेल्स यावर बंदी घालून गर्दी नियंत्रणासाठी नगरपालिकेचे फिरते पथक आणि पोलीस तैनात असतील. आरोग्य विभागाकडून तात्पुरते हॉस्पिटल व दवाखाना तयार केले जात असून येथे २० फिजिओथेरपी डॉक्टर तसेच हिरकणी कक्ष उपलब्ध राहणार आहे. फलटण पालिका वारकऱ्यांच्या सुविधा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.