
दैनिक स्थैर्य । 25 जून 2025 । फलटण । दुचाकीवरून घरी निघालेल्या एका व्यक्तीला तरडगाव येथे चायनीज मांजा कापून हाताच्या बोटांना दुखापत झाली. नितीन दत्तात्रय शिंदे (वय 47), असे जखमीचे नाव आहे.
नितीन शिंदे (रा. कोपर्डे, ता. खंडाळा, हल्ली रा. पाच सर्कल, ता. फलटण) हे कोपर्डे येथील मूळगावी शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम आटोपून ते आपल्या आत्यासोबत दुचाकीवरून पाच सर्कल येथे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास तरडगाव ओढ्यावरील पुलाजवळ आल्यावर त्यांच्या गळ्याला चायनीज मांजा अडकला.
तोंडाला बांधलेला रुमाल कापून मांजा गळ्याला लागताच त्यांनी चटकन हाताने मांजा धरून स्वतःचा बचाव केला. यामध्ये गळ्याला थोडी दुखापत झाली. मात्र, हाताच्या चार बोटांना इजा होऊन मोठ्या जखमा झाल्या. घटनेनंतर शिंदे यांना तत्काळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पतंग उडविण्यासाठी चायनीज मांजास बंदी आहे. मात्र, तरी मुले तो वापरताना दिसतात. पोलिस प्रशासनाकडून मांजाचा वापर टाळावा, अशी जनजागृती केली जाते, तरी अशा घटना घडतात. त्या टाळण्यासाठी चायनीज मांजा विक्री करणार्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.