
थेट WhatsApp वर मिळवा
निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण तालुक्यातील पिंपरी गावात शेतातील मातीवर शेतकऱ्यांसोबत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.
स्थैर्य, माण, दि. १२ ऑक्टोबर : निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण तालुक्यातील पिंपरी गावात शेतातील मातीवर शेतकऱ्यांसोबत साधी दिवाळी साजरी केली.
निसर्गाच्या संकटामुळे शेतात राबवलेले कष्ट आणि पिकांच्या रूपाने उभी केलेली आशा उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदाच्या दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी गावात कोणताही औपचारिक मंच किंवा मानपानाचा बडेजाव न ठेवता, शेतातील मातीवर अंथरलेल्या घोंगड्यावर बसून पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ करत मनमोकळा संवाद साधला. संकट कितीही मोठे असले तरी खचून न जाता धीर सोडू नये, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबाबत बोलताना देसाई म्हणाले की, ही मदत शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना सणाच्या काळात दिलासा मिळावी यासाठी आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना पूर्ण मदत देण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, शेखर गोरे यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





