छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज लहानपणापासून शिकवले पाहिजेत : गुरुवर्य संभाजी भिडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 07 मार्च 2024 | फलटण | आपल्या घरातील पाल्याला लहानपणापासून म्हणजे अगदी वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचे शिक्षण हे लहानपणापासूनच शिकवले पाहिजेत. महाराष्ट्रातील ज्या घरांमध्ये ज्ञानोबा, तुकोबारायांचे गाथा व छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची पुस्तके नाही अशा घरांना काही एक अर्थ नाही; असे मत गुरुवर्य संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये आयोजित धर्मवीर बलिदान मासानिमित्त ते बोलत होते.

वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्या पद्धतीने कार्यरत असतात तेवढ्याच निष्ठेने व तेवढ्याच ताकदीने आत्तासुद्धा आपण काम करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे अत्यंत गरजेचे आहे असेही यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे यांनी स्पष्ट केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या यातना देऊन संपवले आहे; ते आत्ताच्या काळामध्ये कोणीही विसरता कामा नये. सलग एक महिना शरीराचे एक एक अवयव बाद करत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संपवले आहे. औरंगजेबाकडून क्रूर यातना होत असताना सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे कधीही औरंगजेबाला शरण गेले नाहीत. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई कधीही हरलेले नाहीत; हे आपल्या कोणालाही विसरून चालणार नाही; असेही यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे यांनी स्पष्ट केले.

आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी बलिदान मास साजरा झाला पाहिजे. यासाठी वढू बुद्रुक येथून ज्वलंत ज्वाला पेटवुन आणून फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये त्याची ज्योत पोहोचली पाहिजे; असेही यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान फलटणचे हजारो धारकरी उपस्थित होते. यासोबतच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यामधून सुद्धा श्री शिवप्रतिष्ठांच्या प्रमुख धारकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!