स्थैर्य, सातारा, दि.२३: सातारा जिल्ह्यातील तलाठी पदांसाठी 2019 मध्ये परीक्षा झाली होती. मात्र, सुमारे 18 महिन्यांनंतरही परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना अद्यापही नियुक्ती देण्यात आली नाही. यामुळे 1 एप्रिलपर्यंत नियुक्त्या दिल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा उत्तीर्ण परीक्षार्थींनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्हाधिकारी तलाठी पदभरतीसाठी फेब्रु 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. या पदांची परिक्षा जुले 2019 मध्ये घेण्यात आली. साधारण सप्टेंबर-ऑक्टो महिन्यात (2019) या परिक्षेचे गुण या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. या घटनेस साधारण 17-18 महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. पण अद्याप सातारा जिल्हा निवड समितीने व जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. या उमेदवारांसोबत परिक्षा देणारे इतर जिल्हयातील परिक्षार्थी त्या-त्या जिल्हयांमध्ये हजर होऊन, वर्षांचा कालावधी होऊन गेलेला आहे. मध्यंतरी असणारी कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे उमेदवार शांत होते. पण त्यानंतर रखडलेली 5 जिल्ह्यांची तलाठी भरती तात्काळ करावी, असे परिपत्रक शासनाने काढूनसुदधा आजतागायत उमेदवारांना हजर करून घेतले नाही. परिक्षा सर्वांनी एकत्र दिली. मग सेवा देताना भेदभाव का? एक दीड वर्षांच्या दिरंगाईने झालेले आर्थिक, मानसिक, कौटुंबिक नुकसान यास जबाबदार कोण? सातार्याला अर्ज केला हा गुन्हा आहे काय? देशात बेरोजगारी वाढत असताना गेली एक-दीड वर्षे कोणतीही जाहिरात नाही. कोणतीही परिक्षा नाही आणि उत्तीर्ण होऊनसुदधा जुलै 2019 च्या परिक्षेचे जॉइनिंग नाही. उमेदवारांचे भवितव्य प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईने टांगणीला लागले आहे. वारंवार निवेदने, अर्ज, विनंत्या करूनही निराश झालो असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच येत्या 1 एप्रिलपर्यंत नियुक्त्या दिल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 05 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.