राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी ३० नोव्हेंबर अखेर जाहीरनामा सादर करावा -नितीन उबाळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी ३० नोव्हेंबर अखेर जाहीरनामा सादर करावा, असे आवाहन नितीन उबाळे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोग यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम संपन्न केला असून त्यामध्ये राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी समितीकडे माहे ऑक्टोबर २०२३ मध्ये अर्ज सादर केलेले आहेत.

सदर अर्जावर संबंधित निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत किंवा कसे, याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची समितीने छाननी केली असता, जे उमेदवार हे आरक्षित (मागास प्रवर्ग) जागेवर निवडून आलेले नाहीत किंवा ज्या संबंधित अर्जदारांनी निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा या कार्यालयाकडे सादर केला नसल्यामुळे संबंधित प्रकरणावर निर्णय घेता येत नाही. तसेच सर्व प्राप्त अर्जापैकी अद्याप निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा समितीस सादर न केल्यामुळे सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र व त्यांच्या पडताळणीचे नियम २०१२ मधील नियम १७(२)/(३) मधील तरतुदीनुसार निकाली काढण्यात येतील, याची सर्व निवडणुकीमध्ये सहभागी उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आपले प्रकरणी विहित कालमर्यादेत जात पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने दि. ३० नोव्हेंबर २०२३ अखेर आरक्षित (मागासवर्ग) जागेवर निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा या कार्यालयास सादर करावा.

यासंबंधित अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी निवडणुकीमध्ये राखीव जागेवरती निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा दि. ३० नोव्हेंबर २०२३ अखेर समितीस सादर करावेत, असे आवाहन नितीन उबाळे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!