
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । सातारा । वन विभागाने कास पठारावर कुंपण घातल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांची ये- जा मर्यादित झाल्याने पठारावरील फुलांचा बहरही ओसरला होता. फुलांचा बहर नेहमीप्रमाणे असावा आणि इतर समस्याही सुटाव्यात यासाठी कास पठारावरील कुंपण हटवावे, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तज्ञांमार्फत पडताळणी करून जिल्हा प्रशासनाने अखेर कुंपण हटवण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा कास पठार विविध प्रकारच्या फुलांनी बहरण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर दरवर्षी फुलांच्या हंगामात हजारो पर्यटक येत असतात. काही वर्षांपूर्वी वन विभागाने फुलांच्या सुरक्षिततेसाठी पठारावर तारेचे कुंपण घातले होते. त्यानंतर मात्र फुलांच्या संख्येत मोठी घट होऊ लागली. तसेच पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांनाही कुंपणाची अडचण होऊ लागली. कुंपणाचे अनेक दुष्परिणाम होत असल्याने हे कुंपण हटवणे आवश्यक असल्याचे सांगून कुंपण हटवून पूर्वीसारखे पठार मोकळे करा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली होती. जनावरांच्या मुक्त वावरामुळे विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बिया सर्वत्र पसरल्या जायच्या आणि त्यातूनच पठारावर विविध वनस्पती आणि असंख्य रंगाची आणि प्रकारची फुले बहरायची. मात्र तारेच्या कुंपणामुळे पठारावरील फुलांच्या प्रमाणात मोठी घट झाली. पठारावर नेहमीसारखा फुलांचा बहर यावा म्हणून कुंपण हटवणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी शासनस्तरावर पाठपुरावा करून सर्व बाबींची तंज्ञांमार्फत पडताळणी करावी आणि कुंपण हटवावे, अशी मागणी केली होती. तज्ज्ञांच्या पडताळणीतही कुंपणामुळे फुलांची संख्या घटल्याचा निष्कर्ष पुढे आला असून त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पठारावरील कुंपण हटविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील वर्षी हंगामात कास पठारावर नेहमीप्रमाणे रंगीबेरंगी फुलांचा बहर दिसेल आणि पर्यटनही वाढेल, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे.