किमान दोन- चार मोठे उद्योग साताऱ्यात आणा- आ. शिवेंद्रसिंहराजे


पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

स्थैर्य, सातारा, दि. 20 : चीन देशातून कोरोना महामारीची सुरुवात झाली आणि हा साथीचा आजार संपुर्ण जगभर पसरला. यामुळे चीनमधून सर्वप्रकारचे उद्योगधंदे बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. मोठमोठे उद्योग, कंपन्या भारतात येण्यास तयार असून या मोठमोठ्या उद्योगांना महाराष्ट्र राज्याचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी नुकतेच केले असून सातारा शहर आणि तालुक्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी सातार्‍यातही दोनचार मोठे उद्योग सुरु करा, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांना इमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. कोरोनामुळे चीनमधून अनेक मोठमोठे उद्योगधंदे बाहेर पडणार असून त्यातील अनेक भारतात आणि महाराष्ट्रात येतील अशी शक्यता आहे. साताऱ्यातही चारदोन मोठ्या कंपन्या आल्या तर सातारा शहर आणि तालुक्याचा विकास गतिमान होईल. सातारा शहरालगत देगाव, निगडी याठिकाणी नवीन एमआयडीसी मंजूर आहे. याठिकाणी डोंगराच्या पायथ्याची पडीक आणि माळरान जमीन मोठ्या उद्योगांसाठी उपलब्ध होईल. भूसंपादन करताना शेतजमीन न घेता नापीक, पडीक जमीन घ्यावी तसेच जे शेतकरी स्वईच्छेने जमीन देतील ती जमीन संपादीत करुन त्याठिकाणी किमान तीन- चार मोठ्या कंपन्या सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्राधान्य द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

सातारा शहरापासून पुणे, मुंबई, बंगळूर या शहरांना जोडणारा महामार्ग आहे. मात्र सातार्‍यात एकही मोठा उद्योग, कंपनी नाही ही सातारकरांची अनेक वर्षांची खंत आहे. त्यामुळे कोरोनातून निर्माण झालेल्या औद्योगिक संधीचा फायदा सातारा शहर आणि सातारा एमआयडीसीलाही व्हावा आणि दोन- चार मोठे उद्योगधंदे सातार्‍यात नसण्याची सातारकरांची खंत कायमची दूर करावी. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गडकरी, मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार आणि फडणवीस यांच्याकडे केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!