भाजपा नेत्याची हत्या करणा-या उत्तर प्रदेशातील गुंडाला मुंबईत अटक


 

स्थैर्य, मुंबई,दि.६: उत्तर प्रदेशात उद्योगपती आणि राजकीय नेत्याची हत्या करून मागील एक वर्षापासून फरार असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील कुख्यात मिर्ची गँगच्या म्होरक्यास मुंबईमध्ये जेरबंद केले आहे. गुन्हे शाखा क्र. ११ ने ही कारवाई केली आहे. प्रवीण उर्फ आशु उर्फ आकाश राजेंद्र सिंग (३२) असं या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी विलेपार्ले पश्चिम येथील इर्ला मार्केटजवळील आलुवाडी येथे राहत होता. मूळचा हा आरोपी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील आहे.

सप्टेंबर २०१९ मध्ये धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा- हापुड, उत्तर प्रदेश) च्या हद्दीत कुख्यात मिर्ची गँगचा म्होरक्या व त्याचे साथीदारांनी भरदिवसा चारचाकी वाहनातून येवून गोळीबार करून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेता राकेश शर्मा, वय ३५ वर्षे यांची गोळया झाडून हत्या केली होती. त्याबाबत धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा- हापुड़, उत्तर प्रदेश ) येथे भा. दं. वि. कलम ३०२, १२०(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसचे जानेवारी २०२० मध्ये फेज-३, नोएडा पोलीस ठाणे हद्दीत नोएडा स्थित प्रसिध्द उद्योगपती गौरव चांडेल, वय ४५ वर्षे यांची कुख्यात मिर्ची गॅगच्या म्होरक्याने व त्याचे साथीदारांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली व त्याची किया सेल्डोज कंपनीची कार जबरीने चोरुन नेली होती.

या गुन्हयांमध्ये गोळीबार करणारा मिर्ची गँगचा म्होरक्या हा गुन्हा केल्यानंतर पंजाब, हरीयाणा, दिल्ली, महाराष्ट्र अशा वेगवेगळया राज्यात आपले अस्तित्व लपवून रहात होता. त्याकरीता उत्तर प्रदेश पोलिसांनी सदर राज्यांत जाऊन, वेगवेगळया धडक मोहिमा राबवून त्यास पकडण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते, परंतु सदर मुख्य आरोपी हा त्यांना सतत गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी होत असे. हा आरोपी हा नाव व वेश बदलून लपून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता. हा उत्तरप्रदेश, दिल्ली परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून, तो मिर्ची गँग नावाने कुप्रसिध्द टोळी चालवित होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!