बेफिकीर पर्यटकांना पाचगणी पालिकेचा दणका; दोन लाखांचा दंड वसूल


 

स्थैर्य, भिलार, दि.१०: कोरोना संसर्गामुळे तब्बल आठ महिने सुरू ठेवलेला लॉकडाउन अनलॉक करून शासनाने पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी सशर्त परवानगी दिलेली असताना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचगणी पालिकेने पर्यटकांकडून दोन लाख रुपये वसूल केले आहेत.

पाचगणी हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे शासनाची परवानगी मिळताच बऱ्याच पर्यटकांनी पर्यटनासाठी पाचगणीत गर्दी केली. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, हॉटेलमध्ये निवासासाठी अनेक निर्बंध घातल्याने या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पालिकेची “टीम’ या पर्यटकांवर नजर ठेऊन आहे. अशा उल्लंघन केलेल्या पर्यटकांकडून एका महिन्यात पालिकेने तब्बल दोन लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.

दंड वसूल व्हावा, यासाठी नव्हे तर शासनाने दिलेल्या नियमांचे पर्यटकांनी पालन करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पाचगणी शहरात टेबल, पारशी, सिग्णे असे पॉइंट असून, या पर्यटनस्थळांना आवर्जून पर्यटक भेटी देतात. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनावेळी गर्दी होऊ नये व नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पालिका दक्ष आहे. या दंडामुळे पर्यटकांनी पालिकेच्या “टीम’ची धास्ती घेतली आहे. पर्यटकांनी. शासनाच्या नियमांचे पालन करूनच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन या वेळी मुख्याधिकारी श्री. दापकेकर यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!