
दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । सातारा । राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने आत्तापासूनच संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमप्रकाश दि. 28 ते 30 दरम्यान सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये केंद्र शासनाच्या अनुदान योजना त्याचा प्रसार प्रचार संघटनात्मक पातळीवर सदस्य आणि कार्यकारणीशी चर्चा तसेच जाहीर मिळावे आणि रॅली असा भरगच्च दौरा आखण्यात आला आहे, याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य मदन भोसले, अतुल बाबा भोसले, प्रदेश कार्यकारिणीचे विक्रम पावस्कर, भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले धैर्यशील दादा कदम, महिला आघाडीच्या सुरभी भोसले इत्यादी यावेळी उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, भारतातील 144 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून भाजपच्या केंद्रीय समितीने विशिष्ट कालबद्ध कार्यक्रम आखला आहे . या मतदारसंघाच्या यादीत सातारा जिल्ह्याचा समावेश आहे .या निमित्ताने प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून वर्षातून चार वेळा त्यांनी मतदारसंघात तीन दिवसाच्या मुक्कामासाठी जाऊन एकूण तयारीचा आढावा घ्यावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री सोमप्रकाशजी यांच्यावर देण्यात आली आहे त्यांचे आगमन दि. 29 रोजी सकाळी दहा वाजता शिरवळ येथे जिल्ह्याच्या हद्दीवर करण्यात येणार आहे त्यानंतर वाई येथे महागणपती मंदिरात आरती तसेच पाचवड येथे नितीन विसापुरे सरपंच यांचे घरी भेट लिंब येथे कार्यकर्त्यांशी चर्चा आणि फर्न हॉटेलवर येथे कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा असा पहिला दिवसाचा कार्यक्रम आहे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये दुपारी साडेतीन वाजता केंद्र शासनाच्या योजनेचे सन्माननीय लाभार्थी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत येथील दैवज्ञ मंगल कार्यालयामध्ये सायंकाळी सात ते आठ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार असून सर्किट हाऊस येथे पुन्हा ते पत्रकार आणि जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांशी चर्चा करून विविध राजकीय व संघटनात्मक बांधणीची माहिती घेणार आहेत कोरेगाव रहिमतपूर या भागांचा दौरा तसेच उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट येथील युवा कार्यकर्त्यांना सोमप्रकाश संबोधित करणार आहेत.
दिनांक 30 रोजी हुतात्मा स्मारक मलकापूर ते यशवंतराव चव्हाण निवासस्थान कराड यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली काढण्यात येणार असून वेणूताई चव्हाण हॉल येथे कराड तालुक्यातील उद्योगपती व्यापारी तसेच इतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सोमप्रकाशजी घेणार आहेत केंद्र शासनाच्या लागू केलेल्या योजनांचा आढावा सुद्धा या तिसऱ्या दिवसाच्या दौऱ्यामध्ये होणार आहे महिला मोर्चा आघाडीच्या प्रतिनिधींची बैठक दुपारी 12 ते 12:45 यादरम्यान विश्वनाथ मल्टीपर्पज हॉल वाठार येथे होत आहे . हा कार्यक्रम सुरभी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला आहे दुपारी दोन ते तीन कोयना वसाहत कराड येथे तसेच मलकापूर येथील गेस्ट हाऊस वर सोमनाथजी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत या संदर्भात एकूणच सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन संघटनात्मक बांधणीची रणनीती आणि दिशा ठरवली जाणार असून कार्यकर्त्यांना ताकद देणे, बूथरचना मंडल प्रमुख यांच्याकडून अहवाल घेणे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणे इत्यादी कामांच्या जबाबदाऱ्या त्याचा आढावा या सर्व जबाबदाऱ्यांची यथासांग माहिती केंद्रीय मंत्री घेणार असून त्याचा सविस्तर अहवाल केंद्रीय कार्यकारणी समितीला सादर केला जाणार आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र राष्ट्रवादीचे जिल्ह्यात तीनच आमदार उरले आहेत माढा लोकसभा मतदारसंघ हा केंद्रीय माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ होता मात्र तेथे भाजपचा खासदार निवडून आला . आता परिस्थिती बदलली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होतच नाहीत असे नाही तर निश्चितच त्यांना हरवले जाऊ शकते या अनुषंगानेच भाजपने रणनीती आखली असून आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येणार अशी ठाम ग्वाही जयकुमार गोरे यांनी दिली.