फायदेशीर व लोकाभिमुख उपक्रम ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली विविध योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत राज्यभर पोहोचविण्यात येत आहेत. नागपूर जिल्ह्यात 1 मे रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना महानगरपालिका आणि ग्रामीण भागात सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील या फायदेशीर व लोकाभिमुख उपक्रमाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…

 यंदाच्या अर्थसंकल्पात पाचशे ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनाच्या शुभपर्वावर दोनच महिन्यात 317 दवाखाने राज्यभरात सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात 12 दवाखाने सुरु झाले आहेत. सर्वसामान्य माणसाला आरोग्यविषयक खर्चाचा ताण पडू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाचा प्रयत्न आहे.

ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तत्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळणे ही मोठी गरज निर्माण झाली आहे. हीच गरज ओळखून आपला दवाखाना हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीने मुंबईवरुन  या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण राज्यात 317 ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यातील 12 ठिकाणांचा यात समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती होती.

आपला दवाखाना हा एक अतिशय लोकाभिमुख उपक्रम असून या दवाखान्याच्या माध्यमातून 30 विविध सेवा निःशुल्क देण्यात येणार आहे. या दवाखान्यांमध्ये विविध एक्सपर्टला बोलावून एक्सपर्ट कन्सल्टेशन देखील निःशुल्क मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघात या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्ह्यात बारा ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे. यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा प्रामुख्याने समावेश आहे. शहरातील डोरले ले आऊट,  ग्रामीणमधील हिंगणा, कामठी, कुही ,मौदा, वाडी, मोवाड ता. नरखेड, पारशिवणी, रामटेक, थापा ता. सावनेर, उमरेड आणि भिवापूर अशा एकूण 12 ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

आपला दवाखान्यामध्ये मोफत उपचार, तपासणी आणि औषधी देण्यात येणार आहेत. दवाखान्यात सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्णसेवेची वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असणार आहे. बाह्यरुग्ण सेवा, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी लसीकरण या सुविधा प्रामुख्याने पुरविण्यात येणार आहेत.

गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा या दवाखान्यात पुरविण्यात येणार आहेत.  यात फिजिशियन स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, नाक कान घसा तज्ज्ञ यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.दवाखान्यामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी, मदतनीस यांचा समावेश असणार आहे.

ख-या अर्थाने आपला दवाखाना सर्वसामान्यांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेणारा ठरत आहे. देशात आरोग्यावरील दरडोई खर्च वाढला आहे. गेल्या 15 वर्षात आरोग्यावरील खर्चात वाढ झाली आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आरोग्यावरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. फायदेशीर व लोकाभिमुख हा उपक्रम निश्चितच ठरणार आहे.

अतुल पांडे,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर


Back to top button
Don`t copy text!