बारामती पोटनिवडणूक: पहिल्या फेरीत सुनेत्रा पवार यांची मोठी मुसंडी; ८,८६८ मतांसह घेतली आघाडी, विरोधकांची अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता!


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी ८,८६८ मते मिळवत प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. दिवंगत अजित पवार यांची विरोधकांचे ‘डिपॉझिट जप्त’ करण्याची परंपरा कायम राहण्याची चिन्हे.

स्थैर्य, बारामती, दि. 4 मे : उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ‘२०१-बारामती’ विधानसभा मतदारसंघाच्या (AC-BYE) पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (दि. ४ मे २०२६) पार पडत आहे. निवडणूक आयोगाच्या पहिल्या फेरीचे अधिकृत आकडे हाती आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पहिल्याच फेरीत मोठी मुसंडी मारली आहे.

■ पहिल्या फेरीतील अधिकृत आकडेवारी:

निवडणूक आयोगाच्या अधिकृत ‘राऊंड डिक्लेरेशन फॉर्म’नुसार (फेरी क्रमांक १) पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत:

  • सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी): ८,८६८ मते

  • प्रा. आर. वाय. घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी): ३४ मते

  • नोटा (None of the Above – NOTA): २८ मते

उर्वरित बहुतांश अपक्ष उमेदवारांना दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही; पहिल्या फेरीत या इतर उमेदवारांना केवळ ० ते १९ या दरम्यानच मते मिळाली आहेत.

■ विरोधकांचे ‘डिपॉझिट जप्त’ होण्याची परंपरा कायम राहणार?

बारामतीमध्ये दिवंगत अजितदादा पवार निवडणूक लढवत असताना त्यांच्या समोर उभ्या ठाकणाऱ्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त होण्याची एक परंपराच बनली होती. आता सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असून, केवळ त्यांच्या ‘लीड’ची (मताधिक्याची) उत्सुकता सर्वांना लागली आहे. पहिल्याच फेरीतील ८,८६८ विरुद्ध ३४ या प्रचंड मोठ्या फरकावरून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की, बारामतीची जनता अजितदादांची ही ‘विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची’ परंपरा सुनेत्रा वहिनींच्या रूपाने या पोटनिवडणुतीतही तशीच कायम ठेवणार आहे.


Back to top button
Don`t copy text!