

धनगरवाडा-बरड (ता. फलटण) येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 12 मे : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून धनगरवाडा, बरड (ता. फलटण) येथील एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल:
घटनास्थळ आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विनी यशवंत पडळकर असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे तेजस्विनी मागील काही दिवसांपासून नैराश्यात होती. याच नैराश्यातून तिने आज राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू:
या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी तत्काळ तेजस्विनीला उपचारासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार अमोल चांगण हे करत आहेत. निकालाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने आपले जीवन संपवल्याने सर्वत्र चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे.