
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बरड येथे महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष रस्ता सुरक्षा मोहीम राबवली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑक्टोबर : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आळंदी-पंढरपूर महामार्ग ओलांडत असताना एका व्यक्तीस अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
रस्ता सुरक्षेसाठी विशेष जनजागृती मोहीम
या मोहिमेदरम्यान महामार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी रस्ता ओलांडण्याकरिता उपलब्ध असलेल्या भुयारी मार्गाचा (बोगद्याचा) आणि सर्व्हिस रोडचा वापर करावा, याबाबत प्रबोधन करणारे बॅनर लावण्यात आले. महामार्ग ओलांडताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
नागरिकांनी महामार्ग ओलांडताना जीव धोक्यात घालू नये आणि उपलब्ध असलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करावा. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने केले आहे.





