
थेट WhatsApp वर मिळवा
शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ‘शिका, वाचा, जिंका’ असा संदेश दिला.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ : “शिवाजी विद्यापीठाच्या नावातील ‘शि’ म्हणजे शिका, ‘वा’ म्हणजे वाचा आणि ‘जी’ म्हणजे जिंका. हा संदेश विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला क्षेत्रातही आचरणात आणावा,” असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाची सांगता झाली. या समारोपास विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर फलटण बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कला आणि लोकसंस्कृतीचा अविष्कार
समारोप सोहळ्याची सुरुवात शिवाजी विद्यापीठाच्या कलाकारांनी सादर केलेल्या लोकवाद्यवृंदाच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांनी ‘डोले कुणी ते’ हे लोकनृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या वेळी कलाकार किरण भाजीभाकरे आणि आदित्य घाडशी यांनी रामराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना पेन्सिल स्केच भेट दिले. प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांनी केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे यांनी महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा मांडला.
विजेत्या महाविद्यालयांचा गौरव
महोत्सवात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपदासह शताब्दी महोत्सव चषक व लोककला फिरता चषक पटकावला. कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजने कला विभागातील चषक मिळवला. कोल्हापूरच्या शाहूजी लॉ कॉलेजने साहित्य विभागाचा चषक पटकावला, तर इचलकरंजीच्या धनंजयराव कदम महाविद्यालयाने लोकनृत्याचा फिरता चषक मिळवला. मिरज येथील डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज व कस्तुरबाई वालचंद कॉलेजने सांगली जिल्ह्यात अनुक्रमे वैयक्तिक व समूह गटात विजेतेपद पटकावले.





