
स्थैर्य, सातारा, दि. २० जून : धोम आणि धोम बलकवडी धरणांसह मध्यम प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आणि अत्यावश्यक कारणांसाठी पुरवणे सध्या गरजेचे बनले आहे. यामुळे महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या कलम ११ आणि ४९ मधील तरतुदींनुसार, कृष्णा, कुडाळी आणि वसना नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या तसेच बिगरसिंचन आणि औद्योगिक कारणास्तव सुरू असलेल्या सर्व योजनांवर १६ जून २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना सुरळीत सुरू राहतील.
सिंचन विभागाच्या महत्त्वाच्या सूचना आणि इशारा:
-
फौजदारी कारवाई: उपसा बंदीच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी (खाजगी किंवा औद्योगिक) पाणी उपसा केल्यास तो अनधिकृत मानला जाईल. अशा संबंधितांचा पाणी परवाना आणि वीजपुरवठा तब्बल एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल. तसेच, पाणी उपसा करणारे सर्व साहित्य जप्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल.
-
नदी प्रदूषण न करण्याचे आवाहन: सध्या धरणांमध्ये अत्यंत मर्यादित पाणीसाठा शिल्लक आहे. याचा विचार करून, बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी अथवा औद्योगिक वापराचे पाणी थेट नदीत सोडून नदी प्रदूषित करू नये. हे प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी सध्या नदीपात्रात अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नाही.
सर्वांनी या टंचाईच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा नाश टाळावा आणि जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सं. रा. सातपुते यांनी केले आहे.
