
थेट WhatsApp वर मिळवा
भाद्रपद पितृपक्षातील नवमी तिथीला अविधवा नवमी म्हटले जात असून या दिवशी सुवासिन महिलांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे.
स्थैर्य,सातारा, दि. ०३ ऑक्टोबर : पितृपक्षातील नवमी तिथी ही ‘अविधवा नवमी’ म्हणून ओळखली जाते. ज्या महिलांचे पती हयात असतानाच म्हणजेच सुवासिनी म्हणून निधन झाले आहे, त्यांच्या आत्मशांतीसाठी या दिवशी विशेष श्राद्ध आणि तर्पण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, अविधवा नवमीला सुवासिनी पूर्वजांचे श्राद्ध केल्याने कुटुंबाला त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्यामुळे पितृपक्षात या तिथीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते.
अविधवा नवमीचे धार्मिक महत्त्व आणि विधी
अविधवा नवमीच्या दिवशी सकाळी स्नान उरकून घरातील पूजेचे स्थान स्वच्छ केले जाते. या दिवशी आपल्या कुटुंबातील दिवंगत सुवासिन महिलांचे स्मरण करून त्यांच्या आवडीचे अन्नपदार्थ तयार केले जातात. त्यानंतर ब्राह्मणांना किंवा सुवासिन स्त्रीला आदराने घरी बोलावून भोजन दिले जाते. भोजनानंतर त्यांना हळद-कुंकू, वस्त्र, शृंगाराचे साहित्य आणि दक्षिणा देऊन सन्मानपूर्वक निरोप दिला जातो. यामुळे दिवंगत सुवासिनींच्या आत्म्याला शांती लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
श्राद्धाच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे?
या दिवशी श्राद्ध करताना स्वच्छता आणि पवित्रतेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. भोजनामध्ये सात्त्विक अन्नाचाच समावेश असावा. कोणाचीही निंदा करणे किंवा घरात वादविवाद करणे टाळावे. सुवासिनींना शृंगाराचे वाण आणि दान दिल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. या दिवशी भिकाऱ्यांना किंवा गरजूंना अन्न आणि वस्त्रांचे दान करणे देखील अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे.





