सातारा जेलच्या तटावरुन क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांची क्रांतीकारक उडी भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षात सुध्दा प्रेरणादायी…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारत मातेचे सुपूत्र पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटीशांच्या विरुध्द केलेल्या अनेक आंदोलनापैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार दिनांक 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडला. या घटनेस भारतीय जनतेच्यावतीने अण्णांचे या शौर्यास  सलाम !

28 जुलै 1944 रोजी क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सहका-यांनी वाळवा येथे हाळ भागावर राष्ट्र सेवादलातील कार्यकर्त्यांनी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांचेबरोबर वसंतदादा पाटील यांचे मावस भाऊ नारायण जगदाळे, धोत्रेवाडीचे बाबुराव खोत, वसगडयाचे शामगौंडा पाटील आणि नांद्रयाचे बाबुराव पाचोरे हे बाहेरचे पाहुणे म्हणून सभेसाठी आले होते. गावातून फेरी झाल्यानंतर जाहीर सभेचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अण्णांनी भारतमाता, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग व नाना पाटलांच्या नावाच्या घोषणा दिल्या. सभेला मार्गदर्शन करताना अण्णा म्हणाले, जमलेला जनसमुदाय पाहून मला वाटते आपल्या देशाचे स्वातंत्र्य आता दूर राहिलेले नाही. सर्व देशभरातील सामान्य जनता ब्रिटीशांच्या जुलमी सत्ते विरुध्द गोळीस गोळीनेच उत्तर देण्यासाठी जनता रस्त्यावर आली आहे. गावक-यांनो अन्याया विरुध्द लढण्यासाठी भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र बोस यांच्या सारखे जशास तसे उत्तर देणारे नेते जन्माला आले आहेत. त्यांच्या विचाराने हजारों क्रांतिकारक निर्माण झाले आहेत. यासाठी सर्व गावक-यांनी लढण्याची तयारी करुन माझ्या पुढच्या निरोपाची वाट बघा आणि लढायला तयार रहा ! असे आवाहन करुन इतर पाहुण्यांचे मार्गदर्शना नंतर सभेचा कार्यक्रम संपन्न झाला.

सभा संपल्यानंतर निवडक कार्यकर्त्यांच्या बरोबर क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा कोट भागावर गेले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घरा घरातून गोळा केलेल्या भाकरी व कालवण यांचे भोजन करुन तुका नाना देसाई यांच्या घरात विश्रांतीसाठी थांबले. रात्री झोप येत नाही म्हणून नारायण जगदाळे शेकोटी करुन अंगणात शेकत होते. काही वेळाने परत झोपी गेले. परंतु अण्णा झोपलेल्या खोलीच्या दाराला कडी लावायचे विसरुन गेले. पोलीसांच्या खब-यांनी फंद फितुरीने घात केला. आष्टाच्या पोलीसांनी घराला वेढा घालून दार उघडून फौजदार अहमदी व 7-8 पोलीस यांनी बेसावध झोपलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अटक केली. क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा व त्यांच्या सहका-यांनी वाळव्यातील चावडीच्या कट्टयांवर बसवून पोलीस पहा-यावर बसले. अण्णांना पकडल्याची बातमी हा हा म्हणता गावभर पसरली. गावातून अण्णांचे सहकारी हुतात्मा किसन अहिर, खंडू शेळके, नारायण आबा कदम, रामचंद्र संतू अहिर, काका घोरपडे, किसन देसाई यांनी पुढाकार घेऊन गावाजवळ असलेल्या गंजीखान्याच्या वाटेवर माणसे दबा धरुन बसली. पोलीसांच्या ताब्यात असलेल्या नागनाथअण्णा सह स्वातंत्र्य सैनिकांना त्याच्या ताब्यातून सोडविण्यासाठी नियोजन केले होते. पोलीस व वाळव्यातील जनसमुदाय यांच्यामध्ये कोणत्याही क्षणी संघर्षाची ठिंगणी पडणार त्यावेळी हा संघर्ष टाळण्यासाठी नागनाथ अण्णांनी आपल्या प्रमुख सहका-यांना तुम्ही शांत रहा. थोडयाच दिवसात मी परत येतो असे सांगून गावातील जनतेला शांत केले. वाळवा गावातील जनता दु:खी मनाने परतली. त्या दिवशी चुली न पेटविता शांत राहिली. संपूर्ण गांव अण्णांचे अटकेने दु:खी झाला होता तो दिवस होता 29 जुलै 1944.

पोलीसांनी आष्टयापेक्षा इस्लामपूर जेल सुरक्षित म्हणून नागनाथ अण्णांना इस्लामपूर जेलमध्ये आणून ठेवले. इस्लामपूर जेलमधून क्रांतिवीर नागनाथ अण्णांना पलायन करण्याचा बेत राजुताई पाटील, वाय.सी. पाटील, अंता पाटील (काका), किसन पैलवान वगैरे कार्यकर्ते करत होते. अण्णांना अटक करणेबाबत गद्दारी करणा-या एस.डब्ल्यु. देशपांडे यांचा शोध घेऊन त्यांना स्वराज्याची गद्दारी करणा-या खंडोजी खोपडे यांच्याप्रमाणे उजवा हात व डावा पाय तोडून त्यांना शिक्षा देण्याचे काम किसन अहिर पैलवान, किसन गोविंदा जाधव, महादेव राऊ अनुसे (देवास), पांडुरंग गणू पाटील, दिना हिंदु नायकवडी, सखाराम घोरपडे, रामचंद्र अहिर आदी 20-22 लोकांनी पुढाकार घेतला होता. या घटनेमुळे नागनाथ अण्णांचा दबदबा वाढला होता. या घटनेमुळे पोलीस खात्यातील लोकांनी अण्णांना बोलावून डी.वाय.एसपी. भोसले यांनी अण्णांना सांगितले की तुम्ही तुमच्या सहका-यांना बोलावून वाळवा गांव शांत करा. तुमच्या कोणत्याही सहका-यांना अटक करणार नाही असे सांगितले. अण्णांनी कामेरीचे कार्यकर्ते बाळकू पाटील यांचेकडे निरोप देऊन बापूंना (वडील) इस्लामपूरला बोलावून घेतले. त्यांचेकडून सर्व सहका-यांना शांत राहणेस सांगितले. थोडयाच दिवसात मी परत येतोय असा निरोप दिला. त्याप्रमाणे वाळवा गांव शांत झाले. अण्णांचे सर्व सहकारी अण्णा तुरुंगात असल्यामुळे सर्वजण भूमिगत राहिले. यामध्ये जी.डी.बापू लाड यांनी सर्वांना मदत केली. इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये अण्णा असताना वाळव्याचे आप्पासाहेब थोरात सरकार, खंडेराव दाजी थोरात यांनी मामलेदारांच्या घरी मामलेदारांना सांगून भेट घेतली. त्यावेळी आप्पासाहेब सरकारांनी अण्णांना दिलासा दिला. नागनाथ तुम्हाला पकडले म्हणून वाळव्यातला स्वातंत्र्याचा  लढा शांत झाला नाही उलट घरा घरात वाळव्यात क्रांतिकारक तयार झालेत. इस्लामपूर कचेरीतून अण्णांच्या पलायनाची चक्र फिरु लागली. अंघोळीची कपडे धुण्यासाठी जेलच्या बाहेर येत असताना त्या कपडयातून चिठ्ठयांची देवाण घेवाण चालू होती. नेर्ल्याचे अहमद हवलदारांना फितुर केले होते. तुरुंगातून पलायन करायचा आराखडा वाय.सी. पाटील व राजुताई पाटील यांनी बनविला होता. त्या संबंधिची चिठ्ठी वाळलेल्या धोत्रराच्या घडीतून नागनाथ अण्णांच्याकडे पाठविली होती ती चिठ्ठी खाली पडली आणि सी.आय.डी. च्या हाताला लागली. पोलीस खाते खडबडून जागे झाले. डी.एस.पी. सातारा यांनी निरोप धाडले यंत्रणा टाईट केली. दोन दिवसात इस्लामपूर जेलमधून नागनाथ अण्णांना सातारा जेलमध्ये हलविण्यात आले. नागनाथ अण्णांना रात्रीचे वेळी सातारा जेलमध्ये आणून सोडले.

सातारच्या जेलमध्ये दोन तीन दिवस राहिल्यानंतर त्यांनी तेथील राजकीय कैद्यांशी मैत्री जोडणे सुरु केले. जेलमध्ये राहणे त्यांना पसंत नव्हते. जिवंत असून मेल्यासारखे आहे असे त्यांना वाटत होते आणि त्यांनी ही खंत आपल्या जवळच्या राजकीय कैद्यांशी तसेच  जेलमध्ये असलेल्या कामेरीच्या एस.बी. पाटील यांना बोलून दाखविली. एका रात्री अचानक त्यांनी जेल फोडण्याचा विचार बोलून दाखविला. जेल फोडताना सापडलो गेलोच तर गोळीला बळी पडावे  लागणार हे नागनाथ अण्णांना पूर्ण माहित होते. मात्र त्याची पर्वा त्यांनी केली नाही. सातारच्या जेलची रचना विचित्र आहे. आतून त्याचे तट उंच आणि बाहेरुन चढावाची भर असलेले कमी उंच शिवाय सर्व तटावर उभ्या काचा सिमेंटमध्ये बळकट रोवलेल्या होत्या ही माहिती खुद्द नागनाथ अण्णांनी त्यावेळी सांगितली होती. सातारा जेल फोडताना एस.बी. पाटील म्हणाले माझी शिक्षा संपत आली आहे. बर्वे गुरुजीही म्हणाले माझी शिक्षाही संपत आली आहे. शेवटी अण्णा म्हणाले मी जेल फोडून जातो. निदान मला तरी मदत करा.

मला पकडून इग्रजांनी माझा अपमान केला आहे. मला त्यांचा पराभव करुन त्यांना धडा शिकवायचा आहे. काही झाले तरी मी तुरुंग फोडणारच. त्यावर एस.बी. पाटील म्हणाले मी हा जेल फोडून पळून जाण्यासाठी जे नियोजन केले आहे त्या मार्गे तुम्हाला आम्ही मदत करतो. त्याप्रमाणे या कामासाठी नेर्लेच्या शामू रामा, वशीचा सिटचोर साळी व नागठाण्याचे पोलीस अडिसरे यांचा उपयोग करुन तुरुंग फोडायच्या अगोदर सर्वांनी तुरुंग फोडायची ट्रायल घेतली. सातारा  जेलमध्ये येऊन अण्णांना चार दिवस संपणार होते. त्याच दिवशी रविवार दि. 10 सप्टेंबर 1944 रोजी सर्व कैद्यांना अंघोळीसाठी बराकी बाहेर सोडले. प्रथम बर्डे गुरुजी नंतर नागनाथ अण्णा बाहेर आले. बर्डे गुरुजी अंघोळी साठी हौदाकडे गेले. अडिसरे पोलीस गुरुजींच्या बरोबर गेला. एस.बी. पाटील, साळी व शामू रामा चौघेंही पलायनाच्या भिंती जवळ गेले. साळी व शामू रामू भिंतीकडे तोंड करुन बसले. एस.बी. पाटील दोघांच्या खाद्यांवर बसून नागनाथ अण्णा एस.बी. पाटील यांच्या खांद्यावर बसले. नियोजना प्रमाणे पहिली जोडी उभा राहिली. शेवटी अण्णा उभे राहिले. नागनाथ अण्णा भिंतीवर चढले त्यावेळी उगवत्या सुर्याला साक्ष ठेवून कसलाही विचार न करता 18 फूट उंचीच्या तटावरुन त्यांनी उडी मारली. तळ हाताला थोडीशी इजा झाली बाकी कुठेही खट्ट झाले नाही आणि तिथेच बसून   बारीक हराळी उपटू लागले. कुणी पाहिले व एखाद्याला शंका आलीच तर हा माणूस गणपतीला हराळी (दुर्वा) काढत आहे असं वाटाव. कारण त्यावेळी घरोघरी गणपती बसविले होते. यावरुन नागनाथ अण्णांची समय सूचकता दिसून येते.

अण्णांनी त्यावेळी निरकून पाहून व कोणी नाही हे जाणून सरळ सातारा शहराच्या पश्चिम बाजूचा रस्ता धरला आणि अण्णा बेधडक सकाळच्या 6 च्या सुमारास सोमवार पेठेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घराजवळ आले. त्यांच्या दारावर पाटी होती रयत सेवक सोसायटी. नागनाथ अण्णा तिथे थबकले दार अर्धवट उघडे होते. बाहेरच्या व्हरांडयात कॉटवर मच्छरदाणी लावलेली होती. कॉटवर कोणीच नव्हते. समोर कर्मवीरांचा फोटो पाहिला आणि त्यांना हिमालयासारखा आधार वाटला. कर्मवीर अण्णा घरी नाहीत ते पुण्याला गेलेत असे विचारले गेले. मात्र नागनाथ अण्णांनी काम आणि नांव टाळले आणि बोर्डीगचे सुपरिटेंडेंट कोठे आहेत त्यांना बोलावता  का ? असे विचारले. मावशींनी एका मुलाकरवी बोडींगचे सुपरिटेंडेंट असलेल्या ए.डी. आत्तार यांना बोलावले. ते येईपर्यत नागनाथ अण्णा कॉटवर मच्छरदाणीत गाढ झोपले. स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता जेल फोडून आलेला हा ढाण्या वाघ बंदूकधारी पोलीसांचा ससेमिरा कर्मवीरांमुळे आपल्यापर्यत पोहोचणार नाही हे जाणून होते.

क्रांतिवीर नागनाथ अण्णा हे आज हयात नाहीत मात्र सातारा जेल परिसरातून जाताना त्या क्रांतीकारक उडीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा माझी माती माझा देश या उपक्रमाने साजरा होत आहे. या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान देणारे व अतुलनिय पराक्रम गाजविणारे स्वातंत्र्यविरांचे या निमित्ताने आठवण करुया. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या या पराक्रमात व स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्यास या निमित्त विनम्र अभिवादन करुया.

                                                                                                संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

                                                                                                शब्दांकन : शिवाजी पाटील


Back to top button
Don`t copy text!