पाचगणी या पर्यटनस्थळांवर बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, स्टेट बॅंक, जावली बॅंक अशा मोजक्याच एटीएम सेंटरची सेवा आहे; पण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत हे एटीएम बंद असतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व बॅंकाचे एटीएम हे दररोजच्या दररोज सुरू ठेवणे, असा आदेश सर्व बॅंकांना काढला आहे. ज्या बॅंकेचे एटीएम बंद असल्यास त्या बॅंकेच्या शाखेला दंड केला जाईल, असे आदेशात म्हटले असतानाही बॅंकेचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पाचगणी हे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, हे पर्यटक सर्व व्यवहार ऑनलाइन करीत असल्याने आता एटीएम सेंटर ही अत्यावश्यक गरज झाली आहे. स्टेट बॅंक या नामवंत बॅंकेचे एटीएम सेंटर हे सलग दोन महिने बंद असल्याने ग्राहक व पर्यटकांना ही सेवा मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. हे एटीएम सेंटर एक तर हे सुरळीत सुरू ठेवा अन्यथा ते काढून टाका, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
ढिसाळ सेवेमुळे ग्राहक नाराज
स्टेट बॅंकेत दोनच कर्मचारी असल्याने या बॅंकेत व्यवहार करताना ग्राहकांना ताटकळत बसावे लागते, तर किरकोळ कामालाही तासभर लागत आहे. चेक व्यवस्थेची तर बोंबाबोंब आहे. खात्यावर भरलेला चेक वाटण्यासाठी आठवडा उलटला तरी प्रक्रिया होत नाही, या ढिसाळ सेवेमुळे ग्राहक नाराज आहेत.