विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांसाठी खुले : शरद पवार


स्थैर्य,मुंबई, दि. ५: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला. विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचे होते, आता ते सर्वांनाच खुले आहे, असे पवार गुरुवारी दिल्लीत म्हणाले. मात्र पवारांच्या या प्रतिक्रियेने राज्यात मोठाच संभ्रम वाढला आहे.

पवार यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना हे वक्तव्य केले. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष करताना काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षांचे असल्याने आता ते खुले झाले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण असणार यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. अध्यक्षपद खुले झाल्याचे पवार यांनी सांगितल्याने राष्ट्रवादीही या पदासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तर प्रत्येक वाटाघाटीपूर्वी आपल्याला हवे ते निर्णय होण्यासाठी पवार अशी खेळी नेहमीच करत असतात. त्यात नवे असे काहीच नाही, असे सांगून काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने पवारांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट केला.


Back to top button
Don`t copy text!