दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । सातारा । बोरगाव (ता.सातारा) येथे बेवारस रित्या आढळलेल्या व उपचारादरम्यान मयत झालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन बोरगाव पोलिसांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बोरगाव (ता.सातारा) येथील सेवारस्त्यावर असलेल्या रामभाऊ ओढ्याजवळ अंदाजे ३५ वर्षे वयाचा अनोळखी इसम दारूच्या नशेत बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती बोरगाव पोलिसांना ३० जून रोजी मिळाली होती. पोलिसांनी या इसमास उपचारासाठी तात्काळ सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
या अनोळखी इसमावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.या घटनेची बोरगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मयत म्हणून नोंद झाली आहे. मृत इसम हा ३५ वर्षांचा असून अंगाने सडपातळ आहे. उंची ५ फूट ५ इंच,रंगाने सावळा,दोन्ही भुवयांच्या मध्ये काळा मस, छातीवर डाव्या बाजूला वाघाचे चित्र गोंदलेले आहे. या इसमाबाबत कोणास काही माहीत असल्यास बोरगाव पोलीस ठाणे, बोरगाव, ता. सातारा येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी केले आहे.