
दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२६ | काठमांडू |
नेपाळमध्ये महापुराचे थैमान अद्यापही होत असून आतापर्यंतच्या माहितीनुसार ५५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अद्यापही १,५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांमध्ये ३१९ मारतीय पर्यटकांचा समावेश आहे. नव्या वृत्तानुसार नेपाळ-तिबेट सीमेनजीक आणखी एक सरोवर (धरण) फुटले आहे. हे सरोवर चोचेन आणि पुरेपू या नद्यांच्या संगमानजीक होते. ते फुटल्याने या नद्यांचे, तसेच त्रिशुली नदीचे पाणी वाढले आहे. तथापि, बुधवारच्या तुलनेत ही स्थिती कमी तीव्र आहे. चीन आणि नेपाळने काही काळापुरते बचावकार्य थांबविले आहे.
संपूर्ण पूरग्रस्त भागात लेव्हल-४ ची दक्षता घोषित करण्यात आली आहे. आणखी एकदा महापूर येण्याची शक्यता गृहित धरून शक्य तितक्या लोकांना सुरक्षितस्थानी पोहचविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. नद्यांपासून कमीतकमी एक किलोमीटर अंतर राखावे, अशी सूचना लोकांना करण्यात आली आहे.
नेपाळ, भारत आणि चीन यांच्या सहाय्यता पथकांनी आतापर्यंत १ हजार ५०० हून अधिक लोकांना आतापर्यंत वाचविले आहे. वाचलेल्या काही जखमींवर उपचार केले जात आहेत. वाहून गेलेल्यांची नेमकी माहिती आणि संख्या मिळणे कठीण झाल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंबेच्या कुटुंबे वाहून गेली आहेत. शोधकार्यही काही काळापुरते थांबविण्यात आले. मात्र, तीन तासांच्या खंडानंतर मदतकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. आपदा सहाय्यता कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली.
