डॉ. रुपनवर यांचा मुंबईत टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२६ | फलटण |
वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी राजकीय दबाव टाकून वरिष्ठांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी गुरुवारी मुंबईतील सायन रेल्वे स्टेशन परिसरातील हाय व्होल्टेज टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना टॉवरवरून खाली घेतल्याने अनर्थ टळला.

डॉ. रुपनवर यांनी यापूर्वीही दोनवेळा आत्महत्येचा इशारा देत पत्रे व व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहायकाने शस्त्र परवान्यासाठी राजकीय दबाव टाकून त्रास दिल्याचा आरोप करत त्यांनी दि. २९ ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणीही केली होती. वरिष्ठांच्या निर्देशानुसार या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने डॉ. रुपनवर यांचीही चौकशी केली. मात्र, महिना उलटूनही अहवाल जाहीर झालेला नसल्याचा आरोप करत त्यांनी १८ ऑगस्ट रोजी पुन्हा आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यानंतर गुरुवारी त्यांनी मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केला.

वरिष्ठ अधिकार्‍यांवर आरोप…
डॉ. रुपनवर यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर कामात हस्तक्षेप व काही प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कारभार आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!