शेखर गोरे शिंदेसेनेत; एक सप्टेंबरला प्रवेशाचा मुहूर्त

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२६ | सातारा |
राज्यात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माण मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे बंधू शेखर गोरे हेच आता शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. दि. १ सप्टेंबरलाच प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याची माहिती मिळत आहे. यामुळे माण मतदारसंघात जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसणार असून राजकीय गणितेही बदलणार आहेत.

माण विधानसभा मतदारसंघात सध्याचे भाजपचे आमदार व राज्याचे ग्रामविकास मंत्री असणारे जयकुमार गोरे यांनी सलग चार निवडणुका जिंकून विक्रम केला. २०१४ च्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचे बंधू व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे हे इच्छुक होते. त्यांचा स्वतःचा गट असल्याने त्यांनी दंड थोपटले होते. दोघा बंधूंचे राजकीय वैरही होते. पण, भाजप नेत्यांनी शेखर गोरे यांना उभे राहण्यापासून परावृत्त केले. तसेच विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे शेखर गोरे यांनी माघार घेतली. तसेच स्वतः मैदानात उतरून बंधू जयकुमार यांच्या विजयाची नौका पैलतीरावर नेली. जयकुमार यांच्या विजयात शेखर गोरे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच मागील दीड वर्षांपासून शेखर गोरे यांना भाजप नेते शब्द पाळतील असे वाटत होते. तसेच सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजपकडून उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांना होता. पण, तेथेही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आता शेखर गोरे हे शिंदे सेनेत जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
२०१४ च्या माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मिळालेल्या विजयानंतर गोरे बंधूंनी केलेली अ‍ॅक्शन चर्चेची ठरली होती.

फलटणचा राजे गट मागीलवर्षी नगरपालिका निवडणुकीवेळी शिंदेसेनेत गेला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे राजे गटाचे नेतृत्व करत आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचीही ताकद पाठीमागे आहे. त्यामुळे फलटणमध्ये शिंदेसेना स्ट्राँग झाली आहे. तर शेखर गोरे यांच्या येण्याने माणमध्ये शिंदेसेना आणखी मजबूत होऊ शकते.

माण मतदारसंघात नेते अनेक आहेत. प्रत्येक नेत्याचा गट आहे. त्यामुळे सर्वांच्याच मागे मतांची ताकद आहे. शेखर गोरे हे सातारा जिल्हा बँकेचे संचालक असून त्यांच्या पत्नी या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. शेखर गोरे यांचा गट माण तालुक्यात ताकदीने उभा आहे. तसेच माण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खटाव तालुक्यातील गावागावांतही कार्यरत आहे. त्यामुळे शेखर गोरे यांची ताकद गृहीत धरूनच राजकीय पक्ष त्यांच्याकडे पाहतात.

Back to top button
Don`t copy text!