अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे : मंत्री ना. आदिती तटकरे

प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 03 जानेवारी 2023 | फलटण | सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यामधील सर्वांना 300 दिवस हा पोषण आहार द्यावाच लागतो. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विनंती आहे की; त्यांनी लवकरात लवकर रुजू व्हावे; प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून लवकरात लवकर ते सोडवले जातील. शासन दरबारी असणाऱ्या मागण्यांसाठी काम थांबवणे हा मार्ग नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे. अशी शासनाच्या वतीने माझी विनंती आहे; असे मत महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा पाहणी दरम्यान महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ना. तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीच्या प्रदेश युवती उपाध्यक्षा सौ. स्मिता देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांसाठी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुद्धा सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलेले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी मिळण्यासाठी सध्या आपण काम करत आहोत. यामध्ये काही निर्णय हे धोरण धोरणात्मक निर्णय असून त्यामुळे थोडा कालावधी याबाबत लागणार आहे; असेही यावेळी ना. तटकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना ना. तटकरे म्हणाल्या की; राज्यामध्ये असणाऱ्या मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर हे अंगणवाडीमध्ये करण्यात आलेले आहे. याचा जवळपास आकडा हा 13000 हून अधिक आहे. यामुळे मिनी अंगणवाडीच्या सेविका ह्या अंगणवाडी सेविका म्हणून त्यांची पदोन्नती झालेली आहे. प्रत्येक अंगणवाडीला नव्याने मदतनीस म्हणून असलेल्या पदांना सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या या शासन स्तरावर गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होत्या; त्या मार्गी लावण्याचे काम सध्या सुरू आहे. काही मागण्या ह्या शासन स्तरावर आहेत तर काही मागण्या या विभाग स्तरावर आहेत तर काही मागण्या या केंद्र शासनाच्या स्तरावर आहेत.

फलटणला येण्याची फलटणचा राजवाड्यासह फलटणचे श्रीराम मंदिर बघण्याची इच्छा ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून ची होती; ती आज पूर्ण झाली आहे. फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याला एक मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. फलटणला येऊन फलटणचा इतिहास पाहिला आणि नजरेने अनुभवणे हे कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी प्रेरणादायीच आहे; असेही यावेळी ना. तटकरे यांनी स्पष्ट केले.

श्रीमंत रामराजेंच्यामुळेच सईबाई राणीसाहेब यांचे राजगडच्या पायथ्याशी स्मारक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब यांचं गाव म्हणून फलटणची ओळख संपूर्ण राज्यात आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने रायगडच्या पायथ्याशी श्रीमंत छत्रपती सईबाई यांचे स्मारक साकारत आहे. यासोबतच फलटणचा असलेला राजवाडा संवर्धन करण्यासाठी आगामी काळामध्ये शासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येतील. शासन याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल; असेही मत यावेळी मंत्री ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!