
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । दापोली । भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत्मोहत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविले गेले. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला.याच पार्श्वभूमीवर 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड, कृषी महाविद्यालय दापोलीच्या एनसीसी कॅडेट्सनी दि.9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत विद्यापीठात आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा शुभारंभ 9 ऑगस्ट रोजी सर विश्वेश्वरय्या हॉल येथे भारताच्या नवनिर्माणाच्या शपथविधीने झाला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू,एनसीसी एएनओ,एनसीसी युनिटचे 54 कॅडेट्स, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यापीठातील सर्व विद्यार्थी व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.या शपथविधीत स्वच्छ भारत,दारिद्र्यमुक्त, दहशदमुक्त, जातीवादमुक्त भारत हे महत्वाचे मुद्दे होते. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 10 ऑगस्ट रोजी सर्व विद्यार्थ्यांमध्ये नौदलाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, त्याचे महत्त्व व बारकावे कळावे यासाठी ‘नौदल मार्गदर्शन शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन वर्गात विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. दुसाने सर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी नौदलाच्या काही महत्त्वपूर्ण लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती दाखवून त्यांची माहिती दिली.त्याचबरोबर याठिकाणी लढाऊ जहाजांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.सर्व उपस्थितांनी या प्रदर्शनास एनसीसी कॅडेट्सनी भरघोस प्रतिसाद दर्शवला.आपला देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिशेने वाटचाल करताना विविध उपक्रमांबरोबरच स्वच्छतेला देखील तेवढेच महत्त्व दिले पाहिजे यासाठी कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी एनसीसी एएनओ ले.डॉ.हेमंत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कॅडेट्सनी विद्यापीठ परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.या स्वच्छता मोहिमेस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना स्वइच्छेने मदत केली. या उपक्रमास विद्यापीठातील अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थीती दर्शवली. दि. 12 ऑगस्ट रोजी विद्यापीठाने पारंपारिक चिखल रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते.यात विद्यापीठातील सर्व शाखेचे विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सर्व एन.सी.सी कॅडेट्सनी अतुलनीय यश प्राप्त केले.विद्यार्थिनींच्या ‘एनसीसी गर्ल्स’ संघाने चुरशीची लढत देत प्रथम तर विद्यार्थ्यांच्या संघाने अंतिम सामन्यातील अटीतटीच्या लढतीत द्वितीय स्थान प्राप्त केले.या स्पर्धेत विद्यापीठातील १५ हून अधिक संघ सहभागी झाले होते.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विद्यापीठात राबविलेल्या उपक्रमात दि. 13 व 14 ऑगस्ट रोजी विद्यापीठ ग्रंथालयासमोर तिरंगा फडकवून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.दोन्ही दिवशी संपूर्ण विद्यापीठाने ध्वजारोहणाला उत्साहाने उपस्थिती दर्शविली. दि.15 ऑगस्ट या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी विजय क्रीडा संकुल ते विद्यापीठ ग्रंथालयापर्यंत भव्य प्रभातफेरी काढण्यात आली.या प्रभात फेरी मधे विद्यापीठातील सर्व विद्यार्थी,अधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दुमदुमला होता.यानंतर विद्यापीठाचे माननिय कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा दैदिप्यमान सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी एनसीसी विभागाच्या च्या कडेट्सनी केलेले संचलन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. हे संचलन यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालय दापोली एनसीसी युनिटचे सहयोगी छात्रसेना अधिकारी ले.डॉ. हेमंत बोराटे व 19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडचे हवालदार मा.अल्ताफ मुजावर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी माननिय कुलगुरू यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.