शासनाची महत्त्वाकांक्षी योजना “हर घर नर्सरी”


सन २०१९-२० मध्ये जग कोविड-१९ या विषाणूच्या साथ रोगाला सामोरे गेले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या काळात ऑक्सिजनची उपलब्धता हा काळजीचा मुद्दा ठरला. रुग्णांना ऑक्सिजनची उपलब्धता जरी यंत्राद्वारे करण्यात येत असली तरी वातावरणातील ऑक्सिजनचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे नैसर्गिकपणे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या झाडांच्या महत्त्वाबाबत नव्याने जाणीव झाली आहे.

प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने किमान ५० रोपे तयार करावीत

वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी यासाठी हर घर नर्सरी हा उपक्रम राबविण्यात येतो. याअतंर्गत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने किमान ५० रोपे तयार करावेत, त्यानुसार पुढील वर्षाचा वृक्ष लागवडीचा कृती आराखडा तयार केला जातो. यासाठी गावपातळीवरील ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग या उपक्रमात घेतला जातो. गावपातळीवर लोकांमध्ये जागृती करुन सर्व कुटुंबे यामध्ये सहभागी होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.

रोपे निर्मितीसाठी शेतकरी गट, महिलांचा बचत गट यांचे सहाय्य घेण्यात येते. शालेय विद्यार्थी रॅलीच्या माध्यमातून गावामध्ये हर घर नर्सरी बाबत वातावरण निर्मिती करण्यावरही भर दिला जातो. तसेच वर्तमानपत्रे व आकाशवाणी या माध्यमांचेही जनजागृतीसाठी सहाय्य घेण्यात येते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन:

नर्सरी तयार करण्याचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, रेशीम विभाग, कृषी विषयक शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, पर्यावरण तज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, अशासकीय संस्था यांच्याकडील उपलब्ध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येते. आपल्या परिसरातील सावली देणारे वृक्ष, फळे देणारे वृक्ष, औषधी वनस्पतींचे झाडे असे विविध प्रजातींच्या बियाण्यांचे संकलन आतापासूनच सुरू करणे गरजेचे आहे. बिया संकलनाबाबत कार्यपद्धती उपरोक्त यंत्रणांच्या माध्यमातून ठरवली जाते. बिया संकलनात स्थानिक प्रजातींना प्राधान्य दिले जाते. नर्सरी तयार करण्यासाठीची प्राथमिक माहिती असलेली लीफलेट, पाम्प्लेट तयार करुन गावात वाटप केले जातात तसेच त्याबाबत शाळांमधून, ग्रामसभांमधून गावकऱ्यांना प्रात्यक्षिक (डेमॉन्स्ट्रेशन) देण्यात येते. नर्सरी तयार करण्यासाठीचे आवश्यक साहित्य विशेषतः पिशव्या गावपातळीवर उपलब्ध होतील असे प्रयत्न केले जातात. त्यासाठी स्वयंसेवी संस्थाचा सहभाग घेण्यात येतो. ‘हर घर नर्सरीं’ हा उपक्रम लोकसहभागातून हाती घ्यावयाचा असल्यामुळे स्वयंसेवी संस्थांबरोबरच वृक्षसंवर्धनाबाबत जागरुक असलेले नागरिक व इतर संस्था, उद्योग यांची मदत देखील घेतली जाते.

वृक्षलागवड आराखडा :

‘हर घर नर्सरी’ उपक्रमातून तयार होणाऱ्या रोपांच्या अनुषंगाने गावाचा संभाव्य वृक्षलागवड आराखडा तयार केला जातो. गावाची लोकसंख्या, त्यानुसार तयार होणारे रोपसंख्या, वैविध्यपूर्ण रोपे तयार व्हावेत यासाठी करावयाचे नियोजन, रोपे लागवडीचे स्थळ व संख्या याबाबत परिपूर्ण आराखडा गावपातळीवर तयार करण्यात येतो.

या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी म्हणून विभागीय स्तरावर उपायुक्त (रोहयो), जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (रोहयो) व जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), तालुका स्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि गाव स्तरावर प्रत्येक साधारण ५ ते ६ गावांच्या समूहासाठी तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार व गटविकास अधिकारी हे संयुक्तपणे नियुक्ती करतात. यामध्ये महसूल, पंचायत समिती, कृषी, सहकार, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, बांधकाम, पाटबंधारे, शिक्षण, पाणीपुरवठा आदी विभागातील उपलब्ध मनुष्यबळाचा विचार केला जातो.

या उपक्रमाचे नियोजन, संनियंत्रण आढावा घेणे, अहवाल तयार करणे आदींसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  दरमहा सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येते तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येते. याबाबत केलेल्या कार्यवाहीचे अभिलेखे, फोटो, आराखडा, नियोजन आदी संकलित करुन जिल्हास्तरावर जतन करण्यात येतात.

लोकचळवळीचे स्वरुप:

वृक्ष लागवड, रोपे तयार करणे, लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, त्यांचे जतन करणे या सर्व बाबींना लोकचळवळीचे स्वरुप येणे गरजेचे आहे. ‘हर घर नर्सरी’ उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर रोपे उपलब्ध होतील. त्यामुळे पावसाळ्यात वृक्षलागवड करताना भासणारी रोपांची कमतरता दूर होईल. कुटुंबाने स्वत:च बियांपासून रोपे तयार केलेली व लागवड केलेली असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे झाडांबरोबर जिव्हाळ्याचे नाते तयार होईल. त्यातून वृक्ष संगोपन करण्याचे महत्त्वही कुटुंबाच्या आणि जनतेच्या लक्षात येईल.

  • जिल्हा माहिती अधिकारी, धाराशीव (उस्मानाबाद)

Back to top button
Don`t copy text!