स्थैर्य, फलटण दि.13 : डॉक्टर्स, लॅब चालक आणि प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा घोळ झाला असून यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध वाढत आहेत. याचा परिणाम छोट्या व्यापार्यांना भोगावा लागत असून प्रशासनाने सोमवारपासून फलटणमधील सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा नगरसेवक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.
फलटण तालुक्यातील काही डॉक्टर्स, लॅब चालक व प्रांत कार्यालयामधील चुकीच्या कारभारामुळे फलटण मधिल कोरोना पेशंटच्या आकड्याचा घोळ झाला असुन त्यामुळे फलटण तालुक्यातील लॉकडाऊन वाढवले जात आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस, छोटे व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषतः व्यापार्यांची बाजु ऐकुन न घेता त्यांना गुन्हेगारासारखी वागणुक प्रशासन देत आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. यासर्व गोष्टीत सुधारणा करून सोमवार पासुन सर्व व्यवहार सुरळीत करून दुकाने सुरू करण्यास व्यापार्यांना परवानगी न दिल्यास जन आंदोलन करण्यात येईल याची गंभीर नोंद प्रशासनाने घ्यावी. अन्यथा होणार्या पुढील सर्व गोष्टींना प्रशासन जबाबदार राहील, असेही पत्रकात अनुप शहा यांनी म्हटले आहे.