
स्थैर्य, सातारा, दि. ५ जुलै : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे-बंगळूर महामार्गावर सुरू असलेल्या कामाचा दर्जा उघडकीस आला आहे. महामार्गावर आणि सेवा रस्त्यांवर (सर्व्हिस रोड) ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
बाधित ठिकाणे आणि सद्यस्थिती:
-
नांदलापूर ते कोल्हापूर नाका: कोल्हापूरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे चक्क १ ते दीड फूट खोल आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. एका ठिकाणी तर रस्त्यावर चर काढल्याप्रमाणे २ ते ३ फूट लांबीचा खड्डा पडला आहे.
-
पाचवड फाटा आणि मुख्य महामार्ग: कराडच्या दिशेने येणाऱ्या पाचवड फाटा परिसरातील पश्चिम बाजूच्या सेवा रस्त्याची डागडुजी झाल्याने तिथे पाणी साचलेले नाही. मात्र, याच वेळी मुख्य लेनवर पाणी साचल्याने बिकट अवस्था झाली आहे. तर, कराडहून पाचवड फाट्याकडे जाणाऱ्या पूर्व बाजूच्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
-
मलकापूर ते कराड: या दरम्यान उड्डाणपुलाखालील मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे आणि पाणी साचल्याने वाहतूक करणे अत्यंत कठीण बनले आहे.
-
कोयना नदीवरील नवीन पूल: कराडनजीक साताऱ्याकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील कोयना नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाच्या जॉईंट्सवरील भराव आणि डांबर खचले असून, पुलावरच खड्डे पडले आहेत.
ठेकेदाराच्या कामावर संतप्त प्रतिक्रिया:
केवळ चार दिवसांच्या पावसात ठेकेदार कंपनीच्या कामाचे पितळ उघडे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महामार्गासह सेवा रस्त्यालगतच्या नाल्यांची अवस्था ‘असून खोळंबा… नसून घोटाळा’ अशी झाली असून, याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
