
स्थैर्य, मुंबई, दि. 17 : अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन व तिच्यासोबत तिच्या मुलीला अर्थात आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्याला ताप आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिला आणि तिच्या मुलीला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघींचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांना 12 जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांनीही त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करून दिली होती. आता त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच आज काही वेळापूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघींची कोरोना टेस्टही 13 जुलै रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या दोघी होम क्वारन्टाइन होत्या. मात्र आज ऐश्वर्याला ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
12 जुलै रोजी जेव्हा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा काही प्रसारमाध्यमांनी असेही वृत्त दिले होते की ऐश्वयार्र्ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र 13 जुलै रोजी ऐश्वर्याची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघीही होम क्वारन्टाइन झाल्या.