कृषी विभागाने गावनिहाय कांदा क्षेत्राचा अचूक अहवाल तयार करावा : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार


दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । नाशिक । जिल्ह्यात सध्या कांदा पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी, जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व त्याप्रमाणात होणारे कांद्याचे उत्पादन यांचा अंदाज येण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील कांदा पिकाच्या एकूण क्षेत्राची माहिती घेण्यासाठी कृषी सहायकांच्या मदतीने गावनिहाय अचूक अहवाल तयार करावा. त्याचप्रमाणे नाफेड मार्फत जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कांदा खरेदी केंद्रांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा दराबाबत आढावा बैठकीत मंत्री श्रीमती डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहकार संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, दिल्ली नाफेडचे उप व्यवस्थापक निखिल पाडदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्रीमती डॉ. भारती पवार म्हणाल्या की, कृषी विभाग व मार्केट कमिटी यांनी तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन क्षमता चांगली असल्याने निर्यात खुली आहे. कांदा निर्यात करतांना पोर्टवरील प्लगइन पॉईंट वाढविणे, कांदाचाळी व प्रक्रीया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एखादी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यात सर्वांचे सहकार्य व सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. नाफेड मार्फत सद्यस्थितीत सुरू असलेली लाल कांदा खरेदी ही केंद्र सरकारच्या वतीने कांदा उत्पादकांना दिलेला मदतीचा हात आहे. केंद्र व राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. राज्यशासन कांदा खरेदीबाबत सकारात्मक आहे. नाफेड मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीचा दर टप्प्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ कांदा खरेदीसाठी देखील नियोजन करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च व त्यानुसार होणारा नफा याअनुषंगाने कांद्याला भाव मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

या बैठकीत उपस्थित असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधीनी कांदा दर, खरेदी व निर्यात धोरणाबाबत असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्राबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी माहिती सादर केली.


Back to top button
Don`t copy text!