कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा


स्थैर्य, सांगली, दि.२१: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन निर्बंध अधिक कडक करणार आहे. राज्य शासन लागू करत असलेलल्या निर्बंधाची अंमलबजावणी 100 टक्के कडकपणे करुन दिलेल्या सूचनांचे ततोतंत पालन करा, त्यासाठी अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये बंदोबस्ताची सर्वतोपरी तयारी करण्यात यावी. अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण), शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनास दिल्या.

पोलीस अधिक्षक कार्यालयातील बैठक सभागृहात कायद्या व सुव्यवस्था, जिल्ह्यात लागू असलेली संचारबंदी आढावा व पोलीस दलाचा कामकाजाचा आढावा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी घेतला यावेळी पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक सर्वश्री किशोर काळे, कृष्णांत पिंगळे, अश्विनी शेंडगे, अंकुश इंगळे, अशोक वीरकर, नवले, अजित टिके उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल यासाठी पोलीस दलाची बंदोबस्त, नाकेबंदी इत्यादी संदर्भाची तयारी असली पाहिजे. केंद्र शासनाने 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण  देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्याता नाकारता येत नाही. गर्दी होऊ नये याबाबतची तयारीही पोलीस प्रशासनामार्फत करण्यात यावी. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग येत असतील अशा पोलीस ठाण्यांनी अधिकचा पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात यावा. बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलीस वेलफेअर फंडामधून अधिकाऱ्यांना छावणीच्या ठिकाणी फुड पॅकेट, पाणी, प्राथमिक आरोग्याच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे सांगून गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई म्हणाले, रात्रीच्या बंदोबस्तासाठी महिला कर्मचाऱ्यांना नेमण्यात येऊ नये त्याचबरोबर 50 वर्षावरील पोलीसांना बंदोबस्त न देता कार्यालयीन काम, पोलीस स्टेशन मधील काम या ठिकाणी नेमणूक देण्यात यावी.

पोलीस यंत्रणा समाजामध्ये कायद्या व सुव्यवस्था ठेवण्याचे काम करत असल्याने अहोरात्र काम करत असते. सामान्य जनतेमध्ये त्यांना फिरावे लागते यामुळे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असते यामुळे आरोग्याबाबतही पोलीस दलाने दक्षता घ्यावी. कोरोना उपचारासाठी पोलीस वेलफेअर फंडातून पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड सेंटर उभारता येईल का याबाबत उपाययोजना करावी. असे सांगून गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई म्हणाले, पोलीस दलातील प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. पोलीस दलाला सुरक्षा कवच विमा लागू करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहनही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.

पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यावेळी म्हणाले, सांगली पोलीस दलाच्या वतीने 144 कलामाची शासनाच्या आदेशानूसार अंमलबजावणी करण्यात येत असून प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस दलात आतापर्यंत 85 टक्के अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असून 61 टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांना दुसरा डोस ही दिला आहे. उर्वरितांना तातडीने लसीकरण करुन घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. असे सांगून जिल्ह्यात सुरु असलेल्या कोविड बंदोबस्ताची अंमलबजावणी, गुन्हांचा आढावा, ब्रेक द चेन अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा आढावा यावेळी सादर केला.

इस्लामपूर येथे घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इस्लामपूर शहरात केलेल्या उपाययोजना, संचार बंदीच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने केले जाणारे प्रयत्न याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

पेठ-सांगली रस्त्यावर सत्रे चौकात त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरात सुरु असणाऱ्या संचारबंदी बाबत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडून माहिती घेतली. पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, कोरोनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांविषया चर्चा केली. इस्लामपूर शहरात प्रवेश केल्यानंतर असणाऱ्या मुख्य चौकातील वाहतूक व्यवस्था ,पेठ- सांगली रस्त्यावरील वाहतूक, वाघवाडी व पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या गर्दीवर आणि वाहतूक कोंडीसंदर्भात केलेल्या व्यवस्थापनाबाबत माहिती घेत सूचना केल्या. पुणे, मुंबई कडून येणाऱ्या प्रवाशांबाबत काय दक्षता घेतली जाते याबाबत श्री. देसाई यांनी विचारणा केली. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या रेपीड अँटीजन चाचण्या घेत असल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांत ११ जण पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगण्यात आले. भाजीपाला विक्रेते पॉझिटिव्ह सापडल्याने आणि शासनाच्या आदेशानुसार भाजी मंडई ,बाजार बंद केला आहे. घरोघरी फिरून भाजी विक्रीसाठी परवानगी देण्यात आल्याचे पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. शहरातील व मुख्य मार्गवरील वाहतूकीबाबत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!