ठाकरेंच्या आवाहनानंतर परप्रांतीयांनी गावाची वाट धरताच व्यवसायासाठी मुंबईची तरुणाई सरसावली


 स्थैर्य, मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रातून दररोज लाखोंच्या संख्येने मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाला आहे. मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत हे मजूर आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या आग्रहास्तव त्यांच्यासाठी विशेष गाड्यादेखील रोज सोडत आहेत. रोज मजुरांचे जत्थेच्या जत्थे त्यांच्या मूळगावी जात आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे.

मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मुंबईतील तरुणांनी हीच ती वेळ म्हणत मिळेल त्या व्यवसायाकडे वळण्याचा मार्ग शोधल्याचे दिसून येत आहे. मुंबईत अनेक तरणांना उत्तरप्रदेशी, बिहारी तरुणांची संगत मिळाली आहे. त्यांच्या मुंबई सोडून जाण्यानंतर आता मुंबईतील तरुणांनी ही संधी हेरून कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखवले आहे. एक अंधेरीत राहणारा हेमंत गुप्ते नावाचा तरुण शिवसेनेचे काम करायचा. त्याने आता स्वतःचा मासे विकण्याचा धंदा टाकला आहे.

हा मराठी मुलगा, अंधेरी पूर्व चकाला येथे रविवारी त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला, एक समाधान वाटले. ही हिंमत आणि जिद्द हेमंत गुप्तेने दाखवली आहे. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरें यांनी आवाहन केले त्याची सुरुवात हेमंत गुप्तेच्या नावाने झाल्याचे मत शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे एका २२ वर्षीय  मराठी तरुणाने भाज्या, फळं विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. निलेश पोतदार त्याचे नाव आहे.

तो,ओबेरॉय मॉलसमोर आधी भुर्जीची गाडी लावायचा. एका उत्तरप्रदेश मित्राबरोबर त्यानं ते काम सुरू केलं होतं. मित्र गावाला निघून गेल्यानंतर याने स्वतःच व्यवसाय करायचा ठारवलं; कारण याचेही साठलेले पैसे संपले. वडील नाहीत. अपंग आई आणि धाकटा भाऊ यांची जबाबदारी. म्हणून त्याने अगदी परवापासूनच भाजी विकणं सुरू केलं. दोन दिवसांत त्याच्या लक्षात आलं की, फळंही विचारतात लोक.

 म्हणून त्याने आजपासून फळंही विकणे सुरू केले. उत्तरप्रदेशी लोकांकडून शिकलोय की काम करताना लाज बाळगायची नाही. अजूनही आमच्या वस्तीत मुलं बसलीयेत. माझ्याहून जास्त शिकलेल्यांच्या दहा-दहा हजार पगाराच्या नोक-या गेल्यात. त्यांनी लाज सोडून काही कामं सुरू केली पाहिजेत, असे त्या तरुणाने सांगितले. मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या व आकाशवाणीच्या माजी अधिकारी मेधा कुळकर्णी यांनी फेसबूक पोस्टमधून ही माहिती दिली. एकूणच, परप्रांतीयांच्या जाण्यानंतर मुंबईतील मराठी तरुण कोणत्याही कामाची लाज न बाळगता कामासाठी रस्त्यावर उतरताना दिसत आहे. ही सुरुवात आहे.

यासाठी हजारे, लाखो तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले. संपर्ण देश कोरोनाच्या विळख्यात सापडला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशाला टाळं ठोकावं लागलं. मात्र, देश लॉकडाऊन झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने सर्वांनाच आहे तेथेच थांबण्याची विनंती केली होती. तसेच, हातावर पोट असणा-या मजुरांच्या राहण्या, खाण्याची व्यवस्थाही सरकारने केली होती. मात्र, महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांनी त्यांच्या मूळगावी जाण्याचा आग्रह धरला व अखेर सरकारला या मजुरांसाठी विशेष गाड्या सोडाव्या लागल्या.

रोज परप्रांतीय मजुरांचे जत्थेच्या जत्थे मुंबईतून बाहेर पडताना दिसत आहेत. हे मजूर त्यांच्या इच्छेप्रमाणे सुखरूप त्यांच्या मूळगावी पोहचावे हीच सर्वांची पार्थना आहे. मात्र, या निमित्ताने मुंबईचा सर्वाधिक भाग कसा परप्रांतीय मजुरांनी व्यापला होता हे अधोरेखित होते. त्यामुळे राज ठाकरे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे मराठी माणसांनी या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा व रोजगार मिळवावा यासाठी महाराष्ट्रातील तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!