
स्थैर्य, मायणी, दि. 22 : मल्हारपेठ- पंढरपूर राज्यमार्गावर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी मायणी, ता. खटाव पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत 8 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पथक मंगळवारी पहाटे मल्हारपेठ- पंढरपूर राज्यमार्गावर रात्रगस्त घालत होते. त्यावेळी तरसवाडी, ता. खटाव येथून वाळू भरून ट्रक मायणीच्या दिशेने येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, कर्मचारी प्रकाश कोळी, योगेश सूर्यवंशी व होमगार्ड हांगे यांनी तरसवाडी घाटात सापळा रचला. त्यावेळी लाल रंगाचा ट्रक क्र. (एमएच-45 टी-9664) येताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केल्यानंतर त्यामध्ये वाळू भरलेली दिसली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी 8 लाख रुपये किमतीचा ट्रक व 18 हजार रुपये किमतीची 3 ब्रास वाळू, असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक गोरख संभाजी पिसे, रा. म्हसवड, ता. माण यास अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करत आहेत. सदरची कारवाई डी.वाय.एस.पी. बी बी महामुनी व स.पो.नि. मालोजीराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस शिपाई शिरकुळे, सूर्यवंशी, कोळी, सानप व होमगार्ड हांगे यांनी केली.