कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । पुणे । कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना करा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.

शासकीय विश्रामगृह येथे गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी आंबेगाव तसेच शिरूर परिसरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आंबेगाव उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना अधिक वेगाने राबवाव्या लागणार आहेत. कोरोना चाचण्या व उपचार सुविधांवर भर देण्यासोबच नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. लसीकरणचा वेग वाढवावा. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचेही अत्यंत काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. औषधाचा पुरेसा साठा, उपचारसुविधा, मनुष्यबळ उपलब्धता, चाचण्यांचे प्रमाण लसीकरण स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोरोना परिस्थिती, लसीकरण आणि तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मिशन मोडवर लसीकरण मोहीमेसाठी गावनिहाय लसीकरण प्लॅन तयार करण्याच्या आणि  कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री. आयुष प्रसाद म्हणाले, प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करून सरपंच, ग्रामसेवक तसे सर्व यंत्रणांचा सहभाग घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण, हॉस्पीटल, औषधोपचार तसेच इतर व्यवस्थेबाबतही त्यांनी माहिती दिली.

आंबेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत श्री. कोडलकर यांनी तर शिरूर तालुक्यातील उपाययोजनेबाबत संतोषकुमार देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!