
दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । वडूज । वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. सोमवार दिनांक 3 एप्रिलच्या अखेरच्या दिवशी या मतदारसंघात १७७ लोक व शेतकऱ्यांनी वडूज शेती उत्पन्न बाजार समितीसाठी सुमारे दहा लाख रुपये भरणा व खर्च केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुषमा शिंदे या कामकाज पाहत आहेत.
खटाव तालक्यातील सोसायटी मतदार संघातील ११ जागांसाठी ७२, ग्रामपंचायत मतदार संघासाठी चार जागांसाठी २२ ,सर्व साधारण अनुसूचित जाती जमाती एक जागेसाठी ५ व आर्थिक दुर्बल घटक एक जागेसाठी ९, व्यापारी- आडते दोन जागेसाठी १६, हमाल मापाडी एक जागेसाठी १३, महिला दोन जागेसाठी १३ , अशा १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.१७७ एवढ्या विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दि.५एप्रिल रोजी अर्जाची छाननी, दि.६एप्रिल वैध अर्ज आणि २१ एप्रिल रोजी अंतिम यादी त्यानंतर दि.२९एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
खटाव तालुक्यातील १०३ सोसायटी मधून १२८८,१३३ ग्रामपंचायत मधून ११५४ व व्यापारी- आडते-८४१, हमाल-९६४ मतदार आहेत. महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन होत आहे. वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आर्थिक विकास घटल्याने शोककळा पसरली आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन नाही. अशा बिकट परिस्थिती विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर तेवढेच त्याचे नाव होणार आहे. या व्यतिरिक्त हाती काही लागणार नाही. ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अशी विनंती केली जात आहे. दुसऱ्या बाजूला काही नेतेगण कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यास भाग पाडत आहेत. ही वस्तुस्थिती पहाण्यास मिळाली आहे.
खटाव तालुक्यातील भाजप, शिवसेना, अपक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, काहींनी व्यक्तिगत पातळीवर अर्ज दाखल केले आहेत. यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा निधी अधिकृत रित्या झाला आहे. निवडणूक रिंगणात चुरस निर्माण झाली आहे. बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे आहे. पण, शक्यता कमी आहे. यासाठी प्रबोधन करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी प्रामाणिकपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत डांबेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव बनसोडे, दत्ता केंगारे, सचिन इंगळे, बाळासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.