पसरणीजवळ कँनाँलमध्ये ऊसाने भरलेला ट्रक पलटी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । वाई । पसरणी (ता. वाई) येथील भैरवनाथनगर येथे कँनाँलमध्ये ऊसाने भरलेला ट्रक ( क्रं. के ऐ २५ ऐ २१६४) पलटी झाला. सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. ट्रकचालकाच्या लक्षात आल्याने त्याने वेळीच ट्रकमधून खाली उडी घेतली. त्यामुळे जिवितहानी झाली नाही. मात्र ट्रक कॅनॉलमध्ये पलटी झाल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी वाया गेले. धोम पाटबंधारे विभागाने तातडीने कँनाँल बंद केला.

य‍ाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पसरणी तालुका वाई येथील भैरवनाथ नगर नावाच्या शिवारामध्ये बबन शिर्के यांच्या शेतात ऊसतोड चालू होती. बीड येथील ऊसतोड कामगारांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेला ट्रक शिवारातून बाहेर काढला. ट्रक चालक विठ्ठल राठोड व अन्य दोघेजण ट्रक मधुन कराड येथील रयत कारखान्याकडे निघाला होता. धोम डाव्या कालव्याच्या शेजारील रस्त्याने उसाने भरलेला ट्रक घेऊन जाताना मागील चाक जमिनीमध्ये धसल्याने ट्रक एका बाजूला कलू लागला. ही गोष्ट चालकाच्या लक्षात आल्याने त्याने त्वरित खाली उतरून स्थानिक तरुणांच्या मदतीने ट्रकला रश्शा बांधून ट्रक पलटी होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी सदर घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. ऊसाने भरलेल्या संपूर्ण ट्रक कॅनॉलमध्ये पलटी झाल्याने कॅनॉलचे पाणी तुंबले व शेजारील कुंडय़ांमध्ये वाहू लागले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. सायंकाळी १० सुमारास क्रेनच्या सहाय्याने सदर ट्रक कॅनॉलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान दोन पाटबंधारे विभागाच्या वतीने तातडीने कालव्यातील पाणी बंद करण्यात आले होते.

Back to top button
Don`t copy text!