शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सन्मानार्थ स्टुटगार्टमध्ये अल्फॉन वादनाचा खास कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२३ । स्टुटगार्टमध्ये । शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सन्मानार्थ बाडेन-वर्टेमबर्ग राज्याने अल्फॉन वादनाच्या खास कार्यक्रमाचे आयोजन केले. अल्फॉन हे बाडेन-वर्टेमबर्ग प्रांतातील पारंपरिक वाद्य असून, त्याचा इतिहास सोळाव्या शतकापर्यंत जातो. विशेष पाहुण्यांच्या सन्मानार्थ त्याचे आयोजन करण्याची त्या राज्याची परंपरा आहे. महाराष्ट्र आणि बाडेन-वर्टेमबर्ग राज्यांचा प्रवास अधिक सहकार्याच्या दिशेने होईल, असा विश्वास श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

सुखद संध्याकाळ, स्वच्छ आकाश, निवडक पाहुणे आणि धीरगंभीर वादनाने काळजाचा ठाव घेणारा वादकांचा ताफा.. बाडेन-वर्टेमबर्गच्या राजधानीतील शनिवार (दि. १३) संध्याकाळचा माहोल असा सूरमयी होता. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी त्याचा आनंद लुटला. त्यांच्या सोबत बाडेन- वर्टेमबर्गचे मिनिस्टर प्रेसिडेंट विनफ्रीड क्रेचमन आणि स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियान स्टेकमन होते.

अल्फॉन-वादनाचा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. श्री. केसरकर यांनीही कुतुहलाने अल्फॉन वाद्य हाताळले. कौशल्य विकास कार्यक्रम, जर्मन पर्यटकांना महाराष्ट्राचा, विशेषतः कोकणचा परिचय करून देणे, मराठी आणि जर्मन भाषांमधील देवाण – घेवाण यासाठी श्री. केसरकर जर्मनीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासमवेत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल व अन्य वरिष्ठ अधिकारी आहेत.

महाराष्ट्राशी स्नेहबंध व मैत्रीचे नाते दृढ करण्यासाठी श्री. केसरकर यांच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्टुटगार्टमधील भारतीय व सुमारे पाचशे जर्मन नागरिक उपस्थित होते..

बाडेन-वर्टेमबर्ग राज्याचे प्रशासकीय व सरकारप्रमुख विनफ्रीड क्रेचमन व डॉ. स्टेकमन यांनी श्री. केसरकर यांचे स्वागत केले. स्वागतपर भाषणांनंतर अल्फॉर्न-वादनाचा कार्यक्रम सुरू झाला. स्वित्झर्लंडचे हे वाद्य या जर्मन राज्याने आपलेसे केले आहे. जवळपास शंभराहून वादकांनी वेगवेगळ्या प्रकारे वादन केले. त्याने वातावरण भारून गेले होते. श्री. केसरकर व त्यांचे सहकारी अधिकारी या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध झाले.

महाराष्ट्र आणि बाडेन- वर्टेमबर्ग राज्यांच्या राजधान्यांचे म्हणजे मुंबई आणि स्टुटगार्ट यांचे परस्पर सहकार्य अर्धशतकाहून अधिक काळापासून चालू आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दोन्ही राज्ये औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली आहेत. पाहुण्यांच्या सन्मानार्थ अल्फॉन-वादन आयोजित केले जाणे, हा चांगला संकेत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांचा प्रवास अधिक सहकार्याच्या दिशेने चालू होईल, असा विश्वास मंत्री श्री. केसरकर यांनी व्यक्त केला आहे.


Back to top button
Don`t copy text!